

बेळगाव : शिक्षण खात्यातर्फे अनुदानित शाळांतील शिक्षकांच्या रिक्त जागांची माहिती संग्रहित केली जात आहे. प्राथमिक, माध्यमिक शाळांतील शिक्षकांची यादी विषयवार घेतली जात आहे. अनेक शाळांमध्ये बऱ्याच वर्षापासून रिक्त जागा भरल्याच नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
राज्य सरकारने अनुदानित शाळांतील शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्याचे संकेत दिले आहेत. शिक्षण खात्याने संबंधित गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून तातडीने रिक्त जागांची यादी मागितली आहे. त्यामुळे खासगी संस्थाचालकांकडून यादी एकत्रित करण्याचे काम गेल्या आठ दिवसांपासून सुरू आहे.
बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील अनुदानित शाळांतील अनेक पदे रिक्त आहेत. बैलहोंगल तालुक्यातील बालदिन कार्यक्रमात शिक्षणमंत्री मधू बंगारप्पा यांनी अनुदानित शाळांतील रिक्त पदे भरण्यात येणार आहेत, असे सांगितले आहे. अनुदानित शाळांतील शिक्षक कमी वेतनात विद्यादानाची सेवा बजावत आहेत. गेली दहा ते बारा वर्षांपासून शिक्षक सेवा बजावत आहेत. मात्र रिक्त जागा भरलेल्याच नाहीत. त्यामुळे सरकारने जागा भरण्याचे संकेत दिले आहेत. शाळांतून माहिती घेण्यात आली आहे. त्यामुळे अनेक भावी शिक्षकांना आशा प्रज्वलित झाल्या आहेत.