

निपाणी : नजीकच्या तवंदी गावचे सुपुत्र व भारतीय (महाराष्ट्र तटरक्षक ) दलाचे डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल (डीआयजी) सुधाकर पाटील यांना त्यांच्या ३१ वर्षांच्या प्रदीर्घ, समर्पित आणि देदीप्यमान सेवेबद्दल उद्या प्रजासत्ताक दिनी 'तटरक्षक( राष्ट्रपती) पदक' देऊन गौरविण्यात येणार आहे. दरम्यान पाटील यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याने निपाणीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
पाटील यांनी तीन दशकांहून अधिक काळ भारतीय तटरक्षक दलात कार्यरत असताना त्यांनी केवळ देशाच्या सागरी सीमांचे रक्षण केले नाही, तर दलाच्या आधुनिकीकरणातही मोलाची भूमिका बजावली आहे. यामध्ये त्यांनी प्रत्येक नव्या कार्यालयीन नियुक्तीमध्ये त्यांनी संबंधित राज्य व केंद्र शासनाच्या विभागांशी उत्तम समन्वय प्रस्थापित करून तटीय सुरक्षा यंत्रणा अधिक सुदृढ करणे, तुकडीतील जवानांचे आयुष्य अधिक सुयोग्य बनविणे, सर्व महत्वाचे भूसंपादन प्रकल्प मार्गी लावणे, अत्यंत प्रतिष्ठित व कार्यात्मक सज्जतेसाठी आवश्यक निर्माण प्रकल्पांना संरक्षण मंत्रालयाची मंजुरी प्राप्त करणे, महत्त्वाच्या जमिनींचे प्रश्न सोडवणे, गृहनिर्माण प्रकल्पांना गती देणे तसेच 'सजग' या तटरक्षक दलाच्या जहाजाद्वारे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची मान उंचावणे असे अनेक कार्ये पार पाडली. त्यांच्या प्रत्येक कार्यात त्यांचे कौशल्य आणि नेतृत्व गुण दिसून आले आहे.
यात पोरबंदरपासून ते अंदमानपर्यंत आणि दिल्लीपासून ते आखाती देशांतील धोरणात्मक मोहिमांपर्यंत त्यांचा प्रवास सर्वांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. विशेषतः कोविड-१९ च्या कठीण काळात त्यांनी दिल्ली येथे कमांडिंग ऑफिसर म्हणून बजावलेली अप्रतिम कामगिरी त्यांच्या संवेदनशील कर्तव्याची जाणीव करून देते. त्यामुळे त्यांना राष्ट्रपती पदक मिळाल्याने हा सन्मान केवळ त्यांच्या कष्टाचा नाही, तर त्यांनी आजवर जोपासलेल्या प्रामाणिकपणा, शिस्त, सचोटी, संयम, सातत्य आणि मूल्यांचा सन्मान ठरला आहे. दरम्यान पाटील यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याने त्यांचे निपाणी परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे.