Indian Air Force : बेळगावला येणाऱ्या हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचे शेतात लँडिंग

हावेरी जिल्ह्यातील घटना : तांत्रिक बिघाडाचे कारण, सहाजण सुखरुप
Indian Air Force : बेळगावला येणाऱ्या हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचे शेतात लँडिंग
Published on: 
Updated on: 

धारवाड : तांत्रिक बिघाडामुळे भारतीय हवाई दलाचे बेळगावला येणारे हेलिकॉप्टर शेतात सुरक्षितपणे उतरविण्यात आल्याची घटना बुधवारी (दि. ११) सायंकाळी हावेरी जिल्ह्यातील कमनहळ्ळी (ता. शिग्गाव) गावात घडली. हेलिकॉप्टरमधील सर्व सहा जवान सुरक्षित असून, कुणालाही दुखापत झालेली नाही.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, हवाई दलाचे हेलिकॉप्टर (नोंदणी क्र. झेडडी ४०५०) तामिळनाडूतील सुलूर एअर फोर्स स्टेशनवरुन बेळगावकडे येत होते. हावेरीच्या आकाशातून जात हवेतच त्यात अचानक बिघाड झाला. त्याची जाणीव होताच खबरदारीचा उपाय म्हणून वैमानिकाने इमर्जन्सी लँडिंगचा निर्णय घेतला. योग्य जागा पाहून राष्ट्रीय महामार्ग ४८ च्या कडेला असलेल्या कमनहळ्ळी गावाजवळील एका शेतात ते सुरक्षितपणे उतरविण्यात आले. विमानातील सर्व सहाजण सुरक्षित असल्याचे हेलिकॉप्टरमधून चाललेल्या पथकाचे प्रमुख दीपक शर्मा यांनी सांगितले.

घटनेची माहिती मिळताच शिग्गाव पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. हेलिकॉप्टरमध्ये नेमका कोणता तांत्रिक बिघाड झाला आणि त्याच्या लँडिंगचे नेमके कारण काय, याबाबत अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. मात्र, हवाई दलाचे अधिकारी बिघाडाचे स्वरुप निश्चित करून त्यावर उपाययोजना करतील, असे पोलिसांनी सांगितले. हेलिकॉप्टर उतरल्यानंतर महामार्गावरुन जाणारे अनेक प्रवासी आणि जवळपासच्या ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.