Belgaum Crime: गाऊन घातल्याच्या रागातून पत्नीला पेटवले

हत्तरवाडची विवाहिता गंभीर : पतीस अटक
fire crime news
fire crime newsPudhari
Published on
Updated on

खानापूर : पत्नी गाऊन घालत असल्याचा राग धरून पतीने तिला पेटविल्याची घटना नंदगडमधील दुर्गानगरमध्ये (ता. खानापूर) घडली आहे. या घटनेत मंजुळा कृष्णाजी पाटील (वय 27) ही महिला गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर गोव्यातील बांबोळी वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी तिचा पती कृष्णाजी परशराम पाटील (29) याला अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, करजगीतील (ता. खानापूर) मंजुळाचा आठ वर्षांपूर्वी हत्तरवाडमधील कृष्णाजी पाटील याच्याशी विवाह झाला होता. सुरुवातीपासूनच पतीच्या कुटुंबीयांनी तिचा मानसिक व शारीरिक छळ चालवल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. सध्या मंजुळा पतीसोबत नंदगडमधील दुर्गानगर वसाहतीत भाडोत्री घरात राहत होती. 19 एप्रिल रोजी सकाळी 11 च्या सुमारास कृष्णाजीने मंजुळाशी गाऊन परिधान करण्यावरून वाद घातला. गाऊन काढून टाक; अन्यथा तुला सोडणार नाही, अशी धमकी देत स्वयंपाकघरातील काडीपेटीने तिला पेटविले. गंभीर जखमी अवस्थेत तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्थिती चिंताजनक असल्याने पुढील उपचारांसाठी तिला गोव्यातील बांबोळी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

याप्रकरणी मंजुळाची आई संतोषी भातकांडे यांनी नंदगड पोलिस ठाण्यात मुलीच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली. पोलिसांनी बीएनएस कलम 109, 85, सहकलम 3(5) नुसार गुन्हा दाखल करून तपास हाती घेतला. याप्रकरणी पती कृष्णाजी, सासरे परशराम पाटील, सासू रेणुका पाटील, दीर सोमनाथ पाटील यांच्यावर कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप असलेल्या पती कृष्णाजीला पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. डीएसपी डॉ. विरय्या हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रवीकुमार धर्मट्टी, उपनिरीक्षक एस. एस. बदामी, हवालदार यू. बी. शिंत्रे यांनी या प्रकरणाचा तपास केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news