

चिकोडी : पत्नीला त्रास दिल्याने पतीचा खून केल्याप्रकरणी पत्नीसह चार जणांना जन्मठेप व 1 लाख 40 हजार रुपये दंड येथील सातवे अतिरिक्त जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश तारकेश्वरगौडा पाटील यांनी ठोठावला आहे. कृष्णात ऊर्फ पिंटू राजाराम घाटगे (वय 32, रा. हंचीनाळ केएस, ता. निपाणी), अनिता सचिन भोपळे (35, रा. नेर्ली, ता. करवीर, जि. कोल्हापूर), वनिता कृष्णा चव्हाण (वय 29, रा. सिद्धनेर्ली, ता. कागल, जि. कोल्हापूर), गणेश अण्णाप्पा रेडेकर (वय 21, रा. हुन्नरगी, ता. निपाणी) असे शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत.
याबद्दल अधिक माहिती अशी, करवीर तालुक्यातील नेर्ली येथील सचिन सदाशिव भोपळे यांच्याशी निपाणी तालुक्यातील हंचीनाळ केएस येथील अनिता भोपळे हिचा विवाह झाला होता. पण सचिन पत्नी अनितावर संशय घेऊन मारहाण करीत असल्याने 3 सप्टेंबर 2020 रोजी अनिताने माहेरी येऊन भाऊ कृष्णात घाटगे याला याबाबत सांगितले. त्यानंतर कृष्णात घाटगे याने सचिन भोपळे याला हंचीनाळ येथे बोलावून घेतले. तसेच वनिता चव्हाण व गणेश रेडेकर यांनादेखील घरी बोलावून घेतले. रात्री 11.45 वाजता कृष्णात याने तू का वारंवार अनितावर संशय घेऊन त्रास देतोस, असे विचारले असता सचिनने मला येथे बोलावून दादागिरी करता का, असे विचारले. त्यानंतर वादावादी होऊन सचिन घराबाहेर जात असताना आरोपींना त्याला घरामध्ये ओढत आणून काठीने मारहाण केली.
सर्व आरोपींनी सचिनचे हातपाय धरून दोरीने आवळून खून केला. त्यानंतर घराशेजारी असलेल्या सुनील राठोड याला बोलावून वासरू मेले असल्याचे सांगून जेसीबीने खड्डा काढून त्यात सचिनचा मृतदेह पुरला. यावेळी जेसीबीच्या ड्रायव्हर पाहिल्यानंतर कोणाला तरी सांगितल्यास तुलादेखील अशाचप्रकारे जीवे मारण्याची धमकी दिली. याविषयी जेसीबी ड्रायव्हर सुनील राठोड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार प्रकरण दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी सरकारी वकील म्हणून वाय. जी. तुंगळ यांनी काम पाहिले. या प्रकरणाचा तपास निपाणी सीपीआय संतोष सत्यनाईक यांनी करून न्यायालयास आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात सर्व पुरावे, साक्षी पडताळून चिकोडी अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने सर्व आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.