

बेळगाव : पंधरा दिवसांपूर्वी सौंदत्ती तालुक्यातील हुलीकट्टी येथील प्राथमिक शाळेतील अकरा मुलांना विषबाधा झाली होती. शाळेतील पाण्याच्या टाकीत गावातीलच तिघांनी विष मिसळल्याने ही विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुस्लिम मुख्याध्यापकाची बदली व्हावी, यासाठी असा प्रकार गावातीलच तिघांनी केला असल्याची माहिती शनिवारी जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सागर सक्रेप्पा पाटील (वय 29), त्याचा नातेवाईक तरुण नागनगौडा बसाप्पा पाटील (वय 25) व कृष्णा यमनाप्पा मादर (26, तिघेही रा. हुलीकट्टी) अशी या संशयितांची नावे आहेत. त्यांना अटक करून त्यांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉ. गुळेद म्हणाले की, पंधरा दिवसांपूर्वी हुलीकट्टी येथील जनता सरकारी उच्च प्राथमिक शाळेत 11 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या शाळेत 41 विद्यार्थी शिक्षण घेतात. यापैकी 11 विद्यार्थ्यांना अचानक विषबाधा झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. ते सर्व विद्यार्थी बरे झाले असले तरी पोलीस खात्याने सखोल तपास सुरू केला होता.
डॉ. गुळेद म्हणाले की, हुलीकट्टी येथील उच्च प्राथमिक शाळेत सुलेमान घोरी नायक हे गेल्या 13 वर्षांपासून कार्यरत असून सध्या ते मुख्याध्यापक आहेत. ते मुस्लीम असल्याने आपल्या गावातील शाळेत नको, असे एका हिंदूत्ववादी संघटनेचा तालुका अध्यक्ष असलेल्या सागर पाटील याला वाटत होते. शाळेतील विद्यार्थी काही कारणामुळे मृत पावले तर याचा ठपका सदर मुख्याध्यापकावर येईल व त्याची बदली करता येईल, असा विचार त्याने केला. यासाठी त्याने आपल्या कटात त्याचा नातेवाईक असलेल्या नागनगौडा पाटील व कृष्णा मादर यांना सामील करून घेतले.
आपले नियोजन सागरने नागनगौडा व कृष्णा यांना सांगितले. त्यानुसार घटना घडलेल्या दिवशी नागनगौडा व कृष्णा या दोघांनी मुनवळ्ळीला जाऊन खतविक्रीच्या दुकानातून कीटकनाशक आणले. शाळेतीलच एका मुलाला चॉकलेट, कुरकुरे व 500 रूपयांच्या नोटेचे आमिष दाखवले. त्याला सदर कीटकनाशकाची बाटली पाण्याच्या टाकीत ओतण्यास सांगितले. त्यानुसार सदर विद्यार्थ्याने बाटली शाळेतील पिण्याच्या पाण्याच्या टाकीत ओतली. यानंतर येथील पाणी विद्यार्थ्यांनी प्राशन केल्याने त्यांच्या पोटात दुखणे तसेच उलट्या व जुलाबाचा त्रास सुरू झाला.
घटनेची सखोल चौकशी करताना उपरोक्त धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यामुळे या तिघांना अटक करून त्यांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. मुख्याध्यापकांच्या बदलीसाठी विद्यार्थ्यांच्या जीव धोक्यात घालणार्या या तिघा नराधमांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची कारागृहात रवानगी केली. घटनेचा सखोल तपास केल्याबद्दल पोलीस प्रमुखांनी सौंदत्ती ठाणा टीमचे अभिनंदन केले.
प्रकरणातील मुख्य संशयित सागर पाटील हा ढाबा चालवतो. त्याची पाच एकर शेती असून ती तो कसतो. कृष्णा मादर हा वाहनचालक म्हणून काम करत असून, अनेकदा तो सागर पाटील याच्या वाहनावर देखील चालक म्हणून जात असे. कृष्णा अन्य जातीतील मुलीवर प्रेम करतो, हे सागरला माहिती होते. तू जर माझे हे काम केले नाहीस तर तुझे प्रेम प्रकरण मी जगजाहीर करेन, अशी धमकी सागरने आपल्याला दिली होती, म्हणून मी या कटात सामील झालो, असे कृष्णाने पोलिसांना सांगितले.