

बेळगाव : दसरा, दिवाळी आणि छठ उत्सवाच्या काळात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन नैर्ऋत्य रेल्वेने नोव्हेंबर महिन्यात हुबळी-मुजफ्फरपूर मार्गावर विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष रेल्वेच्या दोन्ही दिशेने प्रत्येकी सात फेऱ्या होणार आहेत. बेळगावमार्गे जाणाऱ्या या विशेष रेल्वेमुळे सणासाठी बिहारकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
हुबळी-मुजफ्फरपूर साप्ताहिक एक्स्प्रेस (क्र. ०७३१५) १३, २० व २७ ऑक्टोबर तसेच ३, १०, १७ व २४ नोव्हेंबर रोजी मंगळवारी हुबळीतून दुपारी ४.४५ वाजता रवाना होईल. ही गाडी गुरुवारी दुपारी २.३० वाजता मुजफ्फरपूरला पोचेल. परतीच्या प्रवासात मुजफ्फरपूर-हुबळी एक्स्प्रेस (क्र. ०७३१६) १६, २३ व ३० ऑक्टोबर तसेच ६, १३, २० व २७ नोव्हेंबर रोजी शुक्रवारी सकाळी ८.४० वाजता मुजफ्फरपूरमधून रवाना होईल. ही गाडी रविवारी सकाळी ७.३० वाजता हुबळीला पोचेल.
या विशेष रेल्वेला धारवाड, लोंढा, बेळगाव, घटप्रभा, मिरज, सांगली, कराड, सातारा, पुणे, दौंड, अहिल्यानगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र आणि हाजीपूर या स्थानकांवर दोन्ही दिशेने थांबे देण्यात आले आहेत. विशेष रेल्वेला एकूण १९ बोगी असतील. त्यामध्ये ६ वातानुकूलित थ्री-टियर, ७ स्लीपर क्लास, ४ जनरल सेकंड क्लास, जनरेटर कारसह लगेज-कम-ब्रेक व्हॅन आणि दिव्यांग प्रवाशांसाठी अनुकूल सुविधेसह सेकंड क्लास लगेज-कम-ब्रेक व्हॅनचा समावेश आहे.