

हुबळी : हुबळी शहरात एकाच दिवशी दोन ठिकाणी अल्पवयीन मुलींवर झालेल्या बलात्काराच्या घटनांनी उत्तर कर्नाटकला हादरवून सोडले आहे. शहर आणि अशोकनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या बलात्काराच्या घटना घडल्या असून यामध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश असल्याचे उघडकीस आले आहे.
शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत 14-15 वयोगटातील तीन मुलांनी एका 13 वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची माहिती पोलिसांनी दिली. मुलीचे पालक घरी नसताना त्याच परिसरात राहणाऱ्या मुलांनी तिला एका निर्जन भागात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.
याबाबत हुबळी-धारवाडचे पोलिस आयुक्त एन. शशीकुमार यांनी सांगितले की, हिंसाचाराला बळी पडलेल्या मुलीला संरक्षण देण्यात आले असून तीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यापैकी दोन हायस्कूलचे विद्यार्थी आहेत. दुसरा मुलगा शाळा सोडलेला असल्याचे आढळून आले आहे. पीडित मुलीच्या पालकांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे.
अशोकनगर पोलिस स्थानक परिसरात एका अल्पवयीन मुलीवर दोन अल्पवयीन मुलांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपींनी तिच्या वडिलांवरही हल्ला केल्याची माहिती शशीकुमार यांनी दिली. पहिल्या घटनेत तीन आणि दुसऱ्या घटनेतील चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची चौकशी सुरू आहे.