बेळगाव : गेल्या 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) बसवण्याची सक्ती करण्यात आली आहे. आतापर्यंत अनेकदा यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता याबाबतचा खटला उच्च न्यायालयात असून, 4 डिसेंबरपर्यंत एचएसआरपी नसणार्या वाहनचालकांविरुद्ध सक्तीने कारवाई करू नये अशी सूचना देण्यात आली आहे. मुदतवाढ मिळाल्याने संबंधित वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे.
वाहन चोरी, अनेक गुन्ह्यांमध्ये वाहनांचा वापर व इतर कारणांमुळे परिवहन खात्याने 17 ऑगस्ट 2023 रोजी पहिल्यांदा राज्यामध्ये एचएसआरपीची सक्ती केली. नोंदणीची प्रक्रिया ऑनलाईन असून, अनेकदा सर्व्हरची समस्या निर्माण झाली. त्यामुळे नोंदणी संथगतीने झाली. एचएसआरपीविना असणार्या वाहनांची संख्या सुमारे दोन कोटी आहे. त्यापैकी सुमारे 52 लाख वाहनांनी आतापर्यंत नोंदणी केली आहे. एचआरपीविरुद्ध काहीजणांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावर मुख्य न्यायमूर्ती एन. व्ही. अंजारिया यांनी सुनावणी केली. 4 डिसेंबरपर्यंत नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तोपर्यंत कोणत्याही संबंधित वाहनचालकाविरुद्ध सक्तीने कारवाई करू नये, अशी सूचना दिली.
एचएसआरपी नसेल तर पहिल्यावेळी 500 रुपये दंड आकारण्यात येणार आहे. दुसर्यावेळी पोलिसांनी पकडले तर संबंधित वाहनधारकाला 1000 रुपये दंड केला जाणार आहे. पण, न्यायालयीन आदेशामुळे याबाबतची कारवाई हाती घेण्यात आलेली नाही.
17 ऑगस्ट 2023 रोजी एचएसआरपी नियम लागू करण्यात आला. एचएसआरपी नोंदणी संथगतीने सुरू झाल्याने 16 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर पुन्हा 17 फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढवली. नोंदणीला ठंडा प्रतिसाद मिळाल्याने आणि सर्व्हरच्या समस्येमुळे 31 मेपर्यंत पुन्हा मुदत वाढवली. तेथून पुन्हा 15 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली.