

बेळगाव : महिलांना होणाऱ्या गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाला आळा घालण्यासाठी देशभरात एचपीव्ही (ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस) लसीकरण मोहीम राबवली जात आहे. कर्नाटकातही ही मोहीम वेगाने सुरू असली तरी बेळगाव जिल्ह्यात गती संथ आहे. आतापर्यंत केवळ २१.७ टक्के मुलींना लस देण्यात आली आहे. ९ ते १४ वयोगटातील मुलींसाठी सुरू असलेल्या या मोहिमेत अनेक जिल्ह्यांच्या तुलनेत बेळगाव पिछाडीवर राहिला आहे. गुलबर्गा जिल्हा राज्यात अव्वल आहे.
केंद्र शासनाने फेब्रुवारीपासून एचपीव्ही लसीकरण मोहिमेला वेग दिल्यानंतर आयुष्मान आरोग्य केंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, समुदाय आरोग्य केंद्रे, तालुका रुग्णालये, जिल्हा रुग्णालये आणि सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमार्फत ही लस मोफत दिली जात आहे. राज्यभरात दोन लाख लाभार्थ्यांचा टप्पा पार झाला आहे. मात्र बेळगावात लसीकरणाने वेग पकडलेला नाही.
बेळगाव जिल्ह्यात आतापर्यंत फक्त ९ हजार ६१ मुलींना लस देण्यात आली आहे. एकूण उद्दिष्ट ४५ हजार लसींचे आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, शहरी भागांतील पालकांमध्ये असलेला संकोच, शाळांना लागलेल्या सुट्ट्या, स्थलांतरित कुटुंबांची समस्या, तसेच जनजागृतीतील उणिवा यामुळे मोहिमेच्या गतीवर परिणाम झाला आहे. आरोग्य विभागाकडून आता शाळा स्तरावर विशेष मोहीम, पालकांशी संवाद आणि ग्रामीण भागात जनजागृती कार्यक्रम वाढविण्याची तयारी सुरू असून, पुढील काही महिन्यांत लसीकरणाचा वेग वाढविण्यावर भर दिला जाणार आहे.
राज्यातील सर्वाधिक प्रगती गुलबर्गा जिल्ह्यात झाली असून, तेथे २० हजार ५११ मुलींना लस देण्यात आली आहे. जिल्ह्याने ६८.५ टक्के उद्दिष्ट पूर्ण करत उपलब्ध लसींपैकी ९४.२ टक्के साठ्याचा वापर केला आहे. याशिवाय यादगीर (६०.७ टक्के), शिमोगा (५०.९), हसन (४५.७), बळ्ळारी (४१.५), कोप्पळ (३९.२) तसेच रायचूर आणि चिक्कमगळूर या जिल्ह्यांनीही समाधानकारक प्रगती नोंदविली आहे.