

खानापूर : रंगांची उधळण करत येणारा सण म्हणजे शिमगोत्सव. निसर्ग आणि लोकसंस्कृतीशी पूर्वापार असलेले नाते नव्याने दृढ करणारा शिमगा. तालुक्याच्या घाटमाथ्यावर वसलेल्या पश्चिम भागात या शिमग्याचा थाटच न्यारा असतो. करवल्या, रंगमाला, रोमटामेळ, शिंपणे या पारंपरिक लोककलांनी होळीच्या सणात उत्साहाचा रंग भरतो. हा अनुपम सोहळा अनुभवण्यासाठी आजूबाजूच्या गोवा आणि महाराष्ट्रातूनही रसिकांचा मेळा गावागावात जमतो. या उत्साही उत्सव पर्वाला उद्या गुरुवार दि. 13 पासून सुरुवात होत आहे. त्यानिमित्त पुढील पाच दिवसात होणाऱ्या पश्चिमेचा ऐतिहासिक आणि पारंपरिक ठेवा असलेल्या शिमगोत्सवाचा घेतलेला आढावा.
शहरात होळीचा सण होळी आणि रंगपंचमी या दोनच उत्सवांपुरता मर्यादित असला तरी पश्चिम भागात वैविध्यपूर्ण कार्यक्रमांनी तब्बल पाच दिवस शिमगोत्सव साजरा केला जातो. तालुक्याच्या पश्चिम भागातील बहुतांश गावांमध्ये वैभवशाली लोककलांची जपणूक करत शिमगोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्याची प्रथा आहे. यानिमित्त रंगमाला, रोंबाट, सोंगी, करवल्या आणि घोडेमोडणी या सारख्या मराठीपण टिकवलेल्या लोककलांचा जागर केला जातो. त्यामुळे पुरेपूर मनोरंजनासाठी घाटवासिय सज्ज झाले आहेत.
गोवा आणि कोकणच्या धर्तीवर पश्चिम भागात शिमगोत्सवाची आतुरतेने वाट बघितली जाते. गणेशोत्सवा पाठोपाठ पश्चिम भागातील अनेक गावांमध्ये शिमगा देखील त्याच थाटाने साजरा केला जातो. काम व व्यवसायानिमित्त गोवा, महाराष्ट्रात स्थायिक झालेले लोक देखील या काळात गावात न चुकता उपस्थित राहतात. त्यामुळे वर्षभराच्या इतर काळात शांत भासणारी गावे शिमग्यात गजबजून जातात. संस्कृती आणि परंपरांना जोडून ठेवणारी शिमगा ही चाकरमान्यांना देखील मोठी पर्वणी असते. कणकुंबी, पारवाड, मान, सडा, हुळंद, पाली, देगाव, जामगाव, कृष्णापुर, गवाळी, कोंगळा, तळावडे, चापोली, चिगुळे, चिखले, आमगाव, चोर्ला, हेमाडगा, मेंडील या ठिकाणी शिमगोत्सवाची एकच धूम पाहायला मिळते. अनेक ठिकाणी रात्र जागरणाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. दशावतार आणि नाटकांचे आयोजन करून लोक परंपरा जिवंत ठेवण्याचे काम पश्चिम भागातील मराठी प्रेमी नागरिक करत आहेत.
पहिल्या दिवशी होळीचा खांब वाजत गाजत गावात आणला जातो. देव कलशांची गावातून मिरवणूक काढून मंदिरात पूजा होते. या कार्यासाठी संपूर्ण गाव गोळा होतो. मध्यरात्रीपर्यंत हा सोहळा चालतो. दुसऱ्या दिवशी गावच्या ग्रामदेवतेच्या मंदिरासमोर होळीचा खांब उभा करून धुळवड साजरी केली जाते. सायंकाळी 'रंगमाला' हे लोककला सादर केली जाते.तिसऱ्या दिवशी करवल्याचा खेळ होतो. मान व चोर्ला या दोनच गावांमध्ये हा खेळ सादर केला जातो. या खेळाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रमुख पात्रे साकारणाऱ्या दोन व्यक्ती तब्बल 24 तास न थकता, विश्रांती न घेता पौराणिक व ऐतिहासिक प्रसंग सादर करतात. या कार्यक्रमादरम्यान ओट्या भरण्यासाठी नजीकच्या महाराष्ट्र आणि गोव्यातून हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित राहतात. चौथ्या दिवशी घोडे मोडणे व गावडा-गावडी हे पारंपरिक खेळ सादर केले जातात. रात्री 'रोमटामेळ' (रोंबाट) नामक पारंपारिक समूह नृत्याचा कलाप्रकार सादर केला जातो. आकर्षक पोशाख आणि वैविध्यपूर्ण रंगभूषा हे या खेळाची वैशिष्ट्ये आहेत. पारंपरिक वाद्यांच्या गजरामुळे या खेळाने उत्साहाला उधाण आल्याचे दिसून येते.
पाचव्या दिवशी 'फुल खेळ' खेळला जातो. 'सुरंगी' नामक फुलांचे डोक्यावर तुरे बांधून गावच्या वेशीतून ही मिरवणूक निघते. 'सुरंगी' हे फुल घनदाट जंगलात मिळते. या विधीसाठी हेच फुल आवश्यक असते. ते आणण्यासाठी सात ते आठ किलोमीटर पायपीट करावी लागते. संध्याकाळी शिंपणे खेळून रात्री दशावतारी नाटकाने शिमगोत्सवाची सांगता होते. मान येथे यावर्षी या कलाप्रकारांच्या गाव मर्यादित स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.
आज शहरी भागात रंगपंचमी नैसर्गिक रंगांनी साजरी करा असे आवाहन करण्याची वेळ आलेली असताना पश्चिम भागात साजरा होणारा शिमगोत्सव आजही निसर्गाला घट्ट धरून आहे. कोणत्याही रंगाविना साजरी होणारी इथली रंगपंचमी आणि शिमगोत्सव खऱ्या अर्थाने निसर्गाशी लोकजीवन आणि लोक परंपरांचे असलेले नाते अधिक दृढ करणारा ठरत आहे.
पश्चिम भागातील अनेक गावांत 80 ते 90 फूट उंचीची होळी उभारण्याची प्रथा आहे. विशेष म्हणजे एक ते दीड किमी लांब अंतरावरुन घनदाट जंगलातून गावकरी खांद्यावरुन होळी उचलून आणतात. होळी खांब सजवून मंदिरासमोर उभारण्यात येतात. संपूर्ण ग्रामस्थांच्या उपस्थितीत होलीका दहन करण्यात येते. विविध प्रकारची सोंगे घेऊन प्रत्येक घरासमोर जाऊन मनोरंजनाचे खेळ सादर केले जातात.