

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा
सीमालढ्यात अनेकांनी त्याग केला आहे. आपल्या प्राणांची आहुती देत हा प्रश्न धगधगता ठेवला आहे. सीमालढा व हुतात्म्यांचा इतिहास भावी पिढीला समजावा. त्यातून लढण्याची प्रेरणा मिळावी, यासाठीच हुतात्मा स्मारक भवन उभारण्यात येत असल्याची माहिती मध्यवर्ती म. ए. समितीचे कार्याध्यक्ष तथा माजी आमदार मनोहर किणेकर यांनी दिली.
हिंडलग्यातील हुतात्मा स्मारक आवारात हुतात्मा स्मारक भवन उभारण्यात येणार आहे. याचा भूमिपूजन कार्यक्रम रविवारी (दि. 30) गुढी पाडव्यादिनी झाला. यावेळी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. व्यासपीठावर प्रकाश मरगाळे, बी. एस. होनगेकर, खानापूर म. ए. समिती अध्यक्ष गोपाळ देसाई, आबासाहेब दळवी, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, शंकर चौगुले, युवा समिती नेते शुभम शेळके, अंकुश केसरकर, ता. म. ए. समिती युवा आघाडी अध्यक्ष राजू किणयेकर, शंकर कोनेरी उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले, जगाच्या इतिहासात भाषा आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी चाललेला एकमेव लढा म्हणून सीमालढा ओळखला जातो. मराठी माणूस 1956 पासून झुंज देत आला आहे. अनेकांनी प्राणांचे बलिदान दिले. समितीचा हा दैदिप्यमान लढा पुढील पिढीला समजला पाहिजे. त्याचबरोबर हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण सतत राहिली पाहिजे यासाठी स्मारक उभारण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
म. ए. समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर म्हणाले, भाषा, संस्कृती, लिपी यांचा आग्रह धरत म. ए. समितीचा लढा सुरु आहे. भाषेसाठी प्रदीर्घकाळ चाललेला हा एकमेव लढा आहे. चळवळ गतिमान करण्यासाठी युवकांनी यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. तत्पूर्वी, ता. म. ए. समितीचे कार्याध्यक्ष आर. एम. चौगुले व प्रीती चौगुले दांपत्याच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. बी. एस. होनगेकर यांनी हुतात्मा स्मारकाचे पूजन तर शंकर चौगुले यांनी हुतात्मा स्मारक फलकाचे अनावरण केले.
कार्यक्रमाला मराठा बँकेचे संचालक लक्ष्मण होनगेकर, रमाकांत कोंडुसकर, मार्कंडेय कारखान्याचे अध्यक्ष आर. आय. पाटील, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, मदन बामणे, महेश जुवेकर, आर. के. पाटील, रामचंद्र मोदगेकर, बी. एस. पाटील, माजी नगरसेवक नेताजी जाधव, गोपाळ पाटील, बी. डी. मोहनगेकर, विठ्ठल पाटील, अॅड. शाम पाटील, शिवाजी कुट्रे, गुंडू गुंजीकर, सुरेश राजूकर, एम. बी. गुरव, डी. बी. पाटील, अनिल पाटील, पीयूष हावळ, सतीश पाटील, शिवप्रताप देसाई, माजी जि. पं. सदस्या सरस्वती पाटील, प्रेमा मोरे, माधुरी हेगडे, माजी ता. पं. सदस्या कमल मन्नोळकर, प्रा. मधुरा गुरव आदी उपस्थित होते. अॅड. एम. जी. पाटील यांनी आभार मानले.
आर. एम. चौगुले यांनी नियोजित हुतात्मा स्मारक भवनाबाबत माहिती दिली. स्मारकाची इमारत तीन मजली असणार असून इमारतीच्या कामासाठी अडीच कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. स्मारक लोकवर्गणीतून उभारले जाणार आहे. भवन एक वर्षाच्या आत पूर्ण व्हावे यासाठी सर्वांनी हातभार लावावा, असे आवाहन त्यांनी केले.
1 जून 1986 मध्ये कन्नडसक्ती विरोधी आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांच्या वारसदारांचा आणि जखमी झालेल्या कार्यकर्त्यांचा शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये मारुती शिंदे, भरमा मरुचे, मोहन पावशे, मारुती खन्नूकर, जोतिबा उचगावकर, अनिल पाटील, बसवंत कदम, शिवाजी चव्हाण आदींचा समावेश होता.
हिंडलगा : भूमिपूजन करताना आर. एम. चौगुले व प्रीती चौगुले. शेजारी माजी आमदार मनोहर किणेकर, प्रकाश मरगाळे, मालोजी अष्टेकर, गोपाळ देसाई, आबासाहेब दळवी, बी. एस. होनगेकर आदी.