

बेळगाव : ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे. मेगा गॅसचे बिल भरलेले नाही, असे सांगून अज्ञात व्यक्तीने हिंडलग्यातील ज्येष्ठ नागरिकाची 1 लाख 82 हजार 721 रुपयांना फसवणूक केल्याची घटना नुकतीच घडली आहे. याबाबत सीईएन पोलिसात शनिवारी (दि. 6) गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, हिंडलग्यातील रहिवासी मुकुंद (वय 65) यांना एका भामट्याने 26 नोव्हेंबर रोजी व्हॉट्स अॅप कॉल केला. मी मेगा गॅस कंपनीतून बोलतो आहे. तुमचे बिल थकीत आहे. ते न भरल्यास तुम्हाला देण्यात येणारी सेवा बंद केली जाणार आहे असे सांगितले. त्यावर फिर्यादीने आम्ही बिल भरले आहे असे सांगितल्यानंतर तुम्ही बिल भरलेली पावती पाठवा असे सांगितले.
त्याच्यावर विश्वास ठेवून फिर्यादीने बिल पाठविले. काही वेळातच दुसर्या मोबाईल क्रमांकावरुन पुन्हा फोन आला. त्या व्यक्तीने बिल मिळाले नाही, असे सांगत ई-मेलवर तपशील व बिल पाठवण्यास सांगितले. फिर्यादीने आपल्या संबंधित भामट्याच्या ईमेलवर गॅस बिल पाठविले. तुम्ही बिल भरले आहे. पण, ते अपडेट झाले नाही. अपडेट करण्यासाठी काही प्रक्रिया करावी लागणार आहे, असे सांगून त्याने बँक तपशील मागून घेतला.
त्यानंतर मुकुंद यांच्या युनियन बँकेतील? ? खात्यावरून 1 लाख 82 हजार 721 रुपये 45 रुपये काढून घेण्यात आले. त्यानंतर त्याने आपला मोबाईल बंद केला. आपली फसवणूक झाल्याचे काही वेळानंतर मुकुंद यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी सीईएन पोलिसांत जाऊन तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी अनोळखी भामट्याच्या विरोधात भादंवि माहिती आणि तंत्रज्ञान कायदा 2000 कलम 66 (सी), 66 (डी) अंतर्गत गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.