

बेळगाव : उच्च रक्तदाब हा एक मंदगतीने जीव घेणारा आजार आहे, ज्यामुळे गंभीर आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. हृदय, मेंदू, मूत्रपिंड व इतर आजारांचा धोका वाढतो, असा सल्ला केएलई येथील डॉ. प्रभाकर कोरे रुग्णालय आणि वैद्यकीय संशोधन केंद्राचे वैद्यकीय संचालक डॉ. (कर्नल) एम. दयानंद यांनी दिला.
जागतिक उच्च रक्तदाब दिनानिमित्त केएलई इन्स्टिट्यूटच्या डॉ. प्रभाकर कोरे रुग्णालय आणि वैद्यकीय संशोधन केंद्राच्या हृदयरोग विभागाने बुधवारी (दि. २०) आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन करुन ते बोलत होते.
ते म्हणाले, तरुणांमध्ये उच्च रक्तदाब खूप धोकादायक आहे. अलीकडच्या काळात आहार आणि कामाच्या पद्धतीमुळे उच्च रक्तदाब दिसून येत आहे. त्यावर योग्यवेळी आणि योग्य प्रकारे नियंत्रण ठेवले नाही, तर ते गंभीर आजारात रुपांतरित होते. याचे शरीराच्या विविध अवयवांवर विपरीत परिणाम होतात. त्यामुळे खबरदारी घेणे आवश्यक आहे. उच्च रक्तदाबाबद्दल जनजागृती केली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
विभागप्रमुख डॉ. संजय पोरवाल म्हणाले, उच्च रक्तदाबाची कोणतीही लक्षणे नसतात. परंतु त्यामुळे हृदयविकाराचा झटका, पक्षाघात, मूत्रपिंडाचे आजार आणि अकाली मृत्यूचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो. त्याचे लवकर निदान करून नियमित उपचार आणि आहाराचे पालन केले पाहिजे. लोक उच्च रक्तदाबावर उपचार घेण्यास टाळाटाळ करतात. परंतु, त्यांना आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याचा मोठा धोका असतो. त्यामुळे, रक्तदाबाकडे दुर्लक्ष केल्यास योग्य उपचार घ्यावेत, असे त्यांनी सांगितले. ज्येष्ठ हृदयरोग तज्ज्ञ डॉ. सुरेश पट्टेद, डॉ. समीर अंबर, डॉ. विजयानंद मेटगुडमठ, डॉ. प्रसाद एम. आर., डॉ. सुहासिनी अगर्था. डॉ. विश्वनाथ हेसरुर आदी यावेळी उपस्थित होते.