

बेळगाव : अलमट्टी जलाशयाची उंची वाढविण्यास केंद्र सरकार तसेच सर्वोच्च न्यायालयाची अद्याप मंजुरी मिळाली नाही. तरीही कर्नाटकने छुप्या पद्धतीने म्हणजेच स्किन प्लेट उभारून पाणीसाठा वाढवण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली आहे, असे समजते. मुख्य दरवाजांना तीन ते चार इंचांची प्लेट वरच्या बाजूला जोडली जाते. या प्लेटला स्किन प्लेट असे म्हणतात.
अलमट्टी जलाशयाची उंची 524.256 मीटरपर्यंत वाढविण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. पण अलमट्टीची उंची वाढली तर सांगली, कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात महापुराचा धोका निर्माण होतो. त्यामुळे या उंचीवाढीला महाराष्ट्र सरकारने विरोध केला आहे. हे प्रकरण न्यायालयात आहे. त्यामुळे अत्यंत सावधगिरीने हा प्रकल्प पुढे नेण्यासाठी पडद्यामागे तयारी सुरू आहे. कायदा मंत्री एच. के. पाटील आणि जलसंपदा मंत्री डी. के. शिवकुमार यांनी स्किन प्लेटस् बसवण्यासाठी एक धोरणात्मक योजना आखली आहे.
स्किन प्लेट म्हणजे काय?
जलाशयांमध्ये वापरल्या जाणार्या रेडियल क्रेस्ट गेटस्चा स्किन प्लेट हा एक महत्त्वाचा भाग आहे. हा जलाशयाच्या गेटस्वर बसवलेला एक धातूचा थर किंवा आवरण असते. पाण्याचा अतिरिक्त दाब सहन करतो आणि पाणी साठवतो. सध्याच्या 26 रेडियल क्रेस्ट गटस्वर स्किन प्लेटस् बसवल्याने जलाशयातील पाणीसाठा वाढू शकतो. यामुळे राज्याला अतिरिक्त 63 टीएमसी पाणी उपलब्ध होईल.