

बेळगाव : दोन दिवसांपासून हेस्कॉमच्या एटीपी सेवा बंद झाली आहे. त्यामुळे, वीजबिल भरण्यासाठी ऑनलाईन सेवेचा वापर करावा, असे आवाहन हेस्कॉमने केले आहे.
वीजबिल भरण्यासाठी सलग दुसर्या महिन्यातही लोकांना रांगा लावाव्या लागत आहेत. एटीपी केंद्र बंद असल्यामुळे हेस्कॉमच्या उपकेंद्रांवर ग्राहकांची गर्दी होत आहे. काही ठिकाणी हेस्कॉमने बिलभरणा काउंटरची संख्या वाढविली असली तरी ग्राहकांना बराचकाळ ताटकळत थांबावे लागत आहे.
हेस्कॉमने वीज बिल भरुन घेण्याचे कंत्राट एका खासगी कंपनीला दिले होते. त्या कंपनीकडून शहराच्या विविध भागात एटीपी मशीनद्वारे बिल भरुन घेतले जात होते. परंतु, या कंपनीचे कंत्राट एप्रिलमध्येच संपले आहे. त्यामुळे, हेस्कॉमच्या बिलभरणा केंद्रांवर बिल भरावे लागत आहे. ऑनलाईन बिल भरणे शक्य नसलेले ग्राहक बिलभरणा केंद्रांवर गर्दी करत आहेत.
मुदत दिली जात असून वेळेत बिल न भरल्यास पुरवठा बंद केला जात आहे. त्यामुळे बील मिळताच भरण्यासाठी ग्राहकांची रिघ लागत आहे. लोकांनी बिल भरण्यासाठी उपकेंद्रांवर गर्दी करु नये, रेल्वे स्टेशनसमोरील हेस्कॉम कार्यालय, नेहरुनगर कार्यालय येथे बिल भरावे. त्याचबरोबर शहरातील बेळगाव वन कार्यालयांसह हेस्कॉमची वेबसाईट, तसेच गुगल पे, फोन पे या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने बिल भरता येऊ शकते, असे आवाहन हेस्कॉमकडून करण्यात आले आहे.