

बेळगाव : गेल्या दोन दिवसांपासून हलक्या स्वरूपात कोसळणाऱ्या पावसाने गुरुवारी (दि. २) सकाळपासून जोर पकडला. बेळगावसह खानापूर, कित्तूर, बैलहोंगल आणि हुक्केरीसह संपूर्ण जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली. शहरात दोन दिवस झालेल्या पावसाने काही ठिकाणी पाणीच पाणी झाल्याचे पाहायला मिळाले. हवेतील गारठाही वाढला होता. या पावसाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून पेरण्यांच्या कामाला गती मिळाली आहे. हवामानाचा खात्याच्या अंदाजानुसार अजून दोन दिवस सलग पाऊस पडणार आहे.
शहरात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पडत आहे. पण, त्याला जोर नव्हता. अधूनमधून विश्रांती घेत हलका पाऊस पडत होता. मात्र, रात्रीनंतर पावसाने जार धरला. गुरुवारी पहाटेही जोरदार पाऊस झाला. त्यानंतर थोडीफार विश्रांती घेऊन पावसाने दिवसभर चांगलेच झोडपले. त्यामुळे, सखल भागात पाणीच पाणी झाले. गांधीनगर ओव्हरब्रिज, फ्रूट मार्केट, चन्नम्मा सर्कल, शनिवार खूट, महाद्वार रोड, जिजामाता चौक, नरगुंदकर भावे चौक, मारुती गल्ली, शास्त्रीनगर, समर्थनगर, कपिलेश्वर कॉलनी या भागात पाण्याचा निचरा न झाल्याने पाणी थांबून राहिले. लोकांना पाण्यातूनच वाहने हाकावी लागली.
बाजारात रस्त्यावर बसून भाजी विक्री करणाऱ्यांची तारांबळ उडाली. गटारीतून पाण्याचा निचरा न झाल्याने पाणी रस्त्यावर थांबून राहिल्याने चावी मार्केट, रविवार पेठ, नरगुंदकर भावे चौक येथे रस्त्याच्या कडेला बसून व्यापार करणाऱ्यांना विशेष कसरत करावी लागली. पावसामुळे गुरुवारी तापमान साधारणपणे २४ डिग्री सेल्सियसवर आल्याने हवेत गारठा निर्माण झाला. पूर्व व पश्चिम भागात बुधवार व गुरुवार दोन दिवस पावसाने झोडपून काढले. गुरुवारी राकसकोप भागात जोरदार पाऊस झाल्याने जलाशयाच्या पातळीत एक फुटाने वाढ झाली. जूनमध्ये पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, गेल्या दोन दिवसांत झालेल्या व्यापक पावसाने पिकांना जीवदान मिळाले आहे. भात लावणीसाठी आणि इतर खरीप पिकांच्या वाढीसाठी अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.
गटारींचे पाणी रस्त्यावर
महापालिका दरवर्षी पावसाळ्यापूर्वी गटारीसह नालेसफाईचे काम हाती घेते. यंदा केवळ मुख्य नाल्याची सफाई करण्यात आली. गटारी साफ न केल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा झाला नाही. त्यामुळे, ठिकठिकाणी पाणी रस्त्यावरच थांबून राहिले.