

नितीन थोरात
वैजापूर : तालुक्यात जिल्हा परिषद शाळेत शिक्षण व्यवस्थेलाच हादरवून सोडणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विद्यार्थ्यांना शिस्त, संस्कार आणि आदर्श वर्तनाचे धडे देणारे मुख्याध्यापकच कर्तव्यावर असताना मद्यधुंद अवस्थेत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
ठाकरे गटाचे जिल्हा परिषद सदस्य मनोज गायके यांनी मनूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळेला बुधवारी( २९) अचानक भेट दिली. यावेळी हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आल्याचा दावा करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओही समोर आला असून, त्यामध्ये संबंधित मुख्याध्यापकांची अवस्था संशयास्पद असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबरोबरच शिक्षण व्यवस्थेतील जबाबदारी आणि प्रशासनाच्या देखरेखीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये या घटनेनंतर संतापाचे वातावरण असून, दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी होत आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची लेखी तक्रार जिल्हा परिषद अध्यक्षांकडे करण्यात आली आहे. तसेच संबंधित मुख्याध्यापकांची वैद्यकीय तपासणी करून सत्य परिस्थिती समोर आणावी आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना पदावरून दूर करावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. या संदर्भात गटशिक्षणाधिकारी यांनी प्रतिक्रिया देताना, तक्रार प्राप्त झाली असून संपूर्ण घटनेची सखोल चौकशी केली जाईल.
चौकशीत आरोप सिद्ध झाल्यास संबंधित मुख्याध्यापकांवर नियमानुसार कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. कर्तव्यावर असताना शिक्षक किंवा मुख्याध्यापक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप समोर आल्याने जिल्हा परिषद शाळांमधील शिस्त, उत्तरदायित्व आणि देखरेखीच्या यंत्रणेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता या प्रकरणातील चौकशीत नेमके काय निष्पन्न होते आणि प्रशासन कोणती कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.