

निपाणी : श्री क्षेत्र कुर्ली-आप्पाचीवाडी येथील हालसिद्धनाथ यात्रेचा शनिवार (दि. 11) मुख्य दिवस आहे. त्यानिमित्त महानैवेद्य, मानाच्या नवसाचे अभिषेक व दंडवत कार्यक्रम होणार आहेत. रात्री ढोलवादन, पालखी सबिना कार्यक्रम व पहाटे नाथांची मुख्य दुसरी भाकणूक वाघापूरचे भगवान डोणे व त्यांचे सुपुत्र सिद्धार्थ डोणे कथन करणार आहेत.
या यात्रेसाठी लाखांवर भाविक आप्पाचीवाडीत दाखल झाले आहेत. दरवर्षी नाथांची यात्रा अश्विन भौम पौर्णिमेपासून पाच दिवस साजरी होते. दरम्यान, गजनृत्य कार्यक्रमाने मंदिर परिसर दुमदुमून गेला आहे. शुक्रवारी सायंकाळी भगवान डोणे व सिद्धार्थ ढोणे यांचे प्रमुख मानकऱ्यांसह यात्रास्थळी आगमन झाल्यावर मानपान व धार्मिक विधी पार पडले. त्यानंतर खडक मंदिरात रात्री 9 ते पहाटे 4 यावेळेत ढोलवादन, वालंग, बकरा खेळवण्याचा कार्यक्रम झाला. सबिना सोहळा, पालखी प्रदक्षिणा पार पडली. यावेळी मानाच्या घोड्याला सवाद्य मिरवणुकीने मंदिरात आणण्यात आले.
यावेळी भाविकांनी मोठ्या प्रमाणात भंडाऱ्याची उधळण केली. या यात्रेसाठी देवस्थान यात्रा कमिटी अध्यक्ष, पदाधिकारी, ग्रा. पं. पदाधिकारी, देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी तसेच पोलिस परिश्रम घेत आहेत. कागल, निपाणी आगाराने जादा बसेसची सोय केली आहे.