

मधुकर पाटील
निपाणी : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री क्षेत्र आप्पाचीवाडी-कुर्ली येथील हालसिद्धनाथ देवाच्या यात्रेची रविवारी सायंकाळी ६ वा. मानकरी, पुजारी व भाविकांच्या उपस्थितीत सांगता झाली. गेल्या पाच दिवसापासून सुरू असणाऱ्या या यात्रेत नाथांचे अनेक धार्मिक कार्यक्रम, ढोलवादन, वालंग, गजीनृत्य, बकरा खेळणे आदी कार्यक्रम झाले.
शनिवारी पहाटे नाथांची पहिली व रविवारी पहाटे दुसरी भाकणूककार भगवान डोणे (महाराज) यांचे सुपुत्र सिद्धार्थ डोणे महाराज यांनी तर घुमट मंदिर येथे तिसरी अखेरची भाकणूक भगवान डोणे महाराज (वाघापुरकर) यांनी कथन केली.गेल्या पाच दिवसात या यात्रेसाठी लाखावर भाविकांनी उपस्थिती दर्शविली होती.यात खडक मंदिरात शनिवार उजाडता रविवारी पहाटे नाथांची ४.४५ ते ६.२० या वेळेत दुसरी तर यानंतर घुमट मंदिर येथे सकाळी ९.२५ ते ११.३० या वेळेत तिसरी भाकणूक झाली.
शनिवारी दिवसभर महानैवद्याचा कार्यक्रम व रविवारी सकाळी घुमटातील भाकणूक झाल्यानंतर सायंकाळी ६.३० वा.भाकणूककार डोणे पिता-पुत्र यांच्या हस्ते कर तोडून या यात्रेची सांगता करण्यात आली.तत्पूर्वी वालंग कार्यक्रम झाला. सायंकाळी ५.३० वा. उत्सवस्थळी ढोल वादन व अखंड भंडाऱ्याची उधळण झाली. झाली. त्यानंतर नाथांच्या दोन्ही पालख्यांची व सबिना सोहळ्याची हालसिद्धनाथ व श्री. महालक्ष्मी मंदिर प्रदक्षिणा झाली.
त्यानंतर ७ वा.वाड्यातील मंदिरात नाथांची मूर्ती स्थानापन्न झाली.त्यानंतर कुर्ली येथील देवाची पालखी सोहळा मार्गस्थ झाला.गेल्या पाच दिवसापासून सुरू असणारी यात्रा सुरळीत पार पडली. यासाठी यात्रा कमिटी,पोलीस व ग्रा.प.प्रशासन,देवस्थान ट्रस्ट,पुजारी, मानकरी,ग्रामस्थ या सर्वांनी सहकार्य केले.
सलग पाचव्यावर्षी काळाच्या कसोटीवर उतरणाऱ्या हालसिद्धनाथांच्या भाकणूकीला या यात्रेत मोठा मान आहे. दरवर्षी नाथ आपल्या भाकणुकीतून भक्तांना सावध करीत पुढील भविष्य कथन करतात. यंदा सलग पाचव्यावर्षी शनिवारी व रविवारी पहाटे पहिली व दुसरी भाकणूक भगवान डोणे महाराज यांचे सुपुत्र सिद्धार्थ डोणे महाराज (वय २३ ) यांनी सलग पाचव्यावर्षी भाकणूक कथन केल्याने याची उत्सुकता भाविकात लागून होती.
यात्रेची सांगता होण्यापूर्वी शनिवारी रात्री रविवारी उजाडता खडक मंदिर येथे दुसऱ्या भाकणूकीत सिद्धार्थ डोणे (महाराज) यांनी जग दुनियेत महाप्रलयकांरी आजार येईल यासह ऊस काकवीपासून औषधाची निर्मीती होईल. तर घुमट मंदिर येथे झालेल्या तिसऱ्या भाकणुकीत भगवान डोणे (महाराज) यांनी महाराष्ट्र राजकारणात खेळखंडोबा चालेल,बहीण भावाचे प्रेमप्रकरण जुळून लग्नकार्य होतील अशी नवीन भविष्यवाणी केली.
या यात्रेसाठी कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा व आंध्रप्रदेश या चार राज्यातील भाविक भाकणुकीसह दर्शनासाठी आप्पाचीवाडीत येथे लाखोंच्या संख्येने आले आहेत. त्यामुळे यंदा कधी नव्हे ते या भाकणुक व यात्रेसाठी भाविकांचा महापूर लोटला होता.