

बेळगाव : चंदगड तालुक्यातील हाजगोळी येथे उघडकीस आलेल्या ड्रग्ज निर्मिती कारखान्याचे धागेदोरे बेळगावशी असल्याचे स्पष्ट झाले आहे. ज्या पोल्ट्रीफार्म परिसरात एमडी ड्रग्ज तयार केले जाणार होते, तेथे कामाला असलेला संशयिताचे भाडोत्री घर बेळगावात आहे. तो येथे पत्नीसह राहत असून, तिकडे येऊन-जाऊन नोकरी करत होता. त्याला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पुणे येथील अमली पदार्थ विरोधी जलदकृती दलाच्या पथकाने काही जणांना अटक केली आहे. या पोल्ट्रीफार्ममध्ये कामाला असलेला एक संशयित बेळगावात राहत असल्याची माहिती मिळाल्याने हे पथक रविवारी रात्री बेळगावातही आले होते. बेळगाव पोलिस आयुक्तालयाशी संपर्क करून त्यांनी स्थानिक पोलिसांची मदत घेतली. माळमारुती हद्दीत येणाऱ्या न्यू गांधीनगर परिसरात संशयित राहत असल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी रात्री उशिरा त्याला उचलले. अधिक चौकशीसाठी पथकाने त्याला पुण्याला नेल्याची माहिती मिळाली. सदर संशयित कामाला या पोल्ट्री फार्ममध्ये होता. दिवसभर काम करून तो रात्री बेळगावला येत होता. न्यू गांधीनगर परिसरात त्याचे भाडोत्री घर आहे. तो व पत्नी राहत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
हाजगोळी प्रकरण उघडकीस आल्याने बेळगावचे पोलिसही सतर्क झाले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणखी काही माहिती मिळते का, याची चाचपणी करण्याचे आदेश पोलिस अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. त्यानुसार तपास सुरू आहे. एक पोलिस पथक बेळगावहून हाजगोळीला जाऊन आल्याचेही सांगण्यात येत आहे.