

सचिन तटाळे
भोसे : श्री बिरोबा व महालिंगरायाच्या नावाने चांगभलं.. गजरात टाळ्यांच्या कडकडाटात तसेच मुक्तपणे खोबरे, लोकर, भंडारा आदींची उधळण करत हजारो भाविकांच्या साक्षीने श्री बिरोबा व महालिंगराया या गुरू-शिष्य भेटीचा सोहळा हुन्नुर, ता. मंगळवेढा येथे संपन्न झाला. भेटीच्या मैदानावरती सायंकाळी चार वाजता हजारो भाविकांच्या उपस्थितीमुळे भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.
१७ व्या शतकापासून अखंडितपणे अश्विन वद्य सप्तमीला या गुरू-शिष्य भेटीचा सोहळा हुन्नुर येथे संपन्न झाला आहे. सालाबादप्रमाणे आज सकाळी हुलजंती येथून हजारो भाविक गुरुच्या भेटीसाठी महालिंगरायाची पालखी घेऊन धावत हुन्नुर येथे आले. हुन्नुर गावाशेजारील ओढ्यात विसाव्याच्या ठिकाणी महालिंगरायाची पालखी विसावल्यानंतर हजारो भाविकांनी महालिंगरायाचे दर्शन घेतले. सायंकाळी चार वाजता श्री बिरोबा मंदिरातून गुरू बिरोबाची पालखी ढोल, ताशांच्या गजरात भेटीच्या मैदानावर आल्यानंतर सर्वप्रथम पालखीसमोर असणाऱ्या मानाच्या बैलांची भेट झाली. त्यानंतर हजारो भाविकांच्या साक्षीने भंडारा, लोकर, खोबरे आदींची उधळण मुक्तपणे करत गुरू-शिष्याचा भेट सोहळा संपन्न झाला.
भेटीच्या वेळी भाविकांनी मुक्तपणे भंडाऱ्याची उधळण केल्याने संपूर्ण आसमंत पिवळा धमक झाला होता. हुन्नुर गावच्या अलीकडे वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था केल्यामुळे वाहतूक कोंडी झाली नाही. तसेच मंगळवेढा पोलिस स्टेशनचे अधिकारी पोलिस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने या भेटीचा सोहळा आनंदात पार पडला. कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आदी राज्यातून हजारो भाविकांची उपस्थिती होती.