

कडोली : गृहलक्ष्मीचे दोन महिन्यांचे पैसे जमा झालेत. तुम्ही आधारकार्ड, बँक पासबुक आदी कागदपत्रे द्या. तलाठ्याकडे जाऊन तपासणी करुया. तुम्हाला पैसे मिळतील, असे सांगत एका भामट्याने कडोलीतील महिलेचे सुमारे दीड लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले. इंदू गणपती मायाण्णा (रा. कचेरी गल्ली, कडोली) असे तिचे नाव आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, इंदू नेहमीप्रमाणे सकाळी आपला रोजगार संपवून चावडीजवळ आल्या होत्या. त्या ठिकाणी एक अनोळखी इसम आला. त्याने त्यांच्याशी संवाद साधण्यास सुरवात केली. तुम्ही फार गरीब आहात. तुमचे गृहलक्ष्मीचे दोन हप्ते आलेले आहेत. तलाठ्याजवळ देवगिरी गावचा सनदी आहे. त्याला सांगून तुमचे पैसे जमा करण्यास सांगुया. तुम्ही घरी जाऊन मला कागदपत्रे द्या, असे त्याने सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून इंदू चालतच आपल्या घरी गेल्या. तर तो भामटा नंबर नसलेल्या दुचाकीवरुन त्यांच्या घरी पोचला. एवढेच नाही तर त्यांना कागदपत्रे शोधण्यासही मदत केली.
कागदपत्रे मिळाल्यानंतर तुमचा एक फोटो घेऊया, असे त्याने सांगितले. तुमच्या अंगावरील सोने काढून ठेवा. फोटोत दिसल्यास तुम्ही श्रीमंत आहात असे समजून गृहलक्ष्मीचे पैसे मिळणार नाहीत, अशी भितीही त्याने दाखविले. त्यानुसार इंदू यांनी अंगावरील सोने बाजूला काढून टेबलावर ठेवले. त्यानंतर भामट्याने त्यांना बोलण्यात गुंतवून मोठ्या शिताफीने टेबलावर ठेवलेल्या सोन्यावर डल्ला मारला.
तुम्ही तलाठ्याकडे चला असे सांगून तो पुढे जाऊन पसार झाला. इंदू यांनी पुन्हा घरी येऊन टेबलावर ठेवलेले सोने घालण्यासाठी गेल्या असता ते तिथे नसल्याचे आढळून आले. सोने भामट्याने लंपास केल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी काकती पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदविली. त्यानुसार पोलित उपनिरीक्षक पीएसआय मृत्युंजय यांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील तपास सुरु केला आहे.