

बेळगाव : शहरातील मोकाट जनावरांची समस्या सोडवण्यासाठी गोशाळाचालक पुढे आला आहे. स्वतः जनावरे पकडून दंड वसूल करणे आणि महापालिकेला दंड जमा करण्याची तयारी त्याने दाखवली आहे. या प्रक्रियेत महापालिकेला एकही रुपयांचा खर्च करावा लागणार नाही. यावर सर्वसाधारण सभेत चर्चा करुन निर्णय घेण्याचे महापालिकेच्या नूतन इमारतीत मंगळवारी (दि. 3) झालेल्या आरोग्य स्थायी समितीच्या बैठकीत ठरले. अध्यक्ष श्रीशैल कांबळे अध्यक्षस्थानी होते.
विविध विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. शहरात रहदारीची समस्या मोठ्या प्रमाणात होत आहे. मोकाट जनावरांमुळे त्यात भर पडत आहे. महापालिकेकडे मनुष्यबळ कमी असल्यामुळे एका गोशाळाचालकाने जनावरे पकडण्यासाठी अर्ज केला आहे. जनावरांना पडकून मालकांकडून एक हजारऐवजी दोन हजार रुपये दंड आकारण्यात येईल. त्यातील एक हजार रुपये महापालिकेला देण्यात येतील. वाहन आणि मनुष्यबळाचा खर्च स्वतः केला जाईल. महापालिकेला कोणताही खर्च करावा लागणार नाही. असा त्याचा प्रस्ताव असल्याची माहिती पर्यावरण विभागाचे साहाय्यक कार्यकारी अभियंता हणमंद कलादगी यांनी दिली. त्यावर हा विषय सर्वसाधारण सभेत चर्चा करुन संमत करू, असे सांगण्यात आले.
महापालिकेच्या वाहनांत उत्तर विभागात एकाच ठिकाणी इंधन भरण्यात येत असल्याने एकाचवेळी गर्दी होत आहे. ती दूर करण्यासाठी दक्षिण विभागातही इंधन भरावे, असे सांगण्यात आले. सफाई कामगारांना किमान वेतन आयोगाच्या निर्णयानुसार महिन्याला 792 रुपये अधिक द्यावे लागणार आहेत, अशी माहिती देण्यात आली. नाले सफाईसाठी दोन वेगवेगळी पथके करुन लवकरात लवकर नाले सफाई पूर्ण करावी. सर्वांनी प्रत्येक प्रभागात फॉगिंग करावे, अशा सूचना यावेळी करण्यात आल्या.
स्मशानभूमीत काम करणारे माळी व्यवस्थित काम करत नाहीत. त्यामुळे त्यांच्या बदल्या करण्याच्या सूचना करण्यात आल्या. तर सर्व उद्यानांत माहितीचे फलक लावण्याबाबतही सांगण्यात आले. बैठकीला सत्ताधारी गटनेते हणमंत कोंगाली, सदस्य राजू भातकांडे, दीपाली टोपगी, माधवी राघोचे, रुपा चिक्कलदिनी, अस्मिता पाटील, लक्ष्मी लोकरी, कौन्सिल सेक्रेटरी प्रियांका विनायक यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.