

निपाणी : गेल्या काही वर्षांपासून सोन्यातून ग्राहकांना चांगला परतावा मिळत असल्याने सोन्यात गुंतवणूक करण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. यात दिवसेंदिवस भाव वाढत असले तरी गुरुपुष्यामृत दिवशी सोने खरेदी करणारा विशेष वर्ग आहे. पारंपरिक रिवाजाप्रमाणे पितृपक्षात नवीन वस्तू खरेदी करू नये, असा संकेत आहे. मात्र हा विचार हळूहळू बदलत असून ग्राहक सोने खरेदी करत असल्याचे सराफ व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
सोने दरात वाढ होत असल्याने निपाणीतील सराफी पेठेत दसरा आणि दिवाळी पाडव्याची सोन्याची खरेदी नागरिकांकडून आतापासूनच केली जात आहे. सोन्याचा भाव आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडींनुसार ठरत असतात. त्यामुळे पितृपक्षात सोन्याचे दर कमी आणि दसरा, दिवाळीला दर वाढतात, हा गैरसमज असून सोन्याचे भाव वाढत असले? ? पितृपक्षातील वातावरण आता पहिल्यासारखे राहिलेले नाही.
गेल्या काही वर्षात ग्राहकांचा ट्रेन्ड बदलल्याने पितृपक्ष पंधरवढ्यात सोने खरेदीला पसंती दिली जात आहे. खास करून पुष्कराज अंगठी, मंगळसूत्र, चोख सोन्यापाठोपाठ नेकलेस, ब्रेसलेट, बांगडया, चेन खरेदीला पसंती मिळत आहे. गुरुवारी गुरु पुष्यामृत होती. त्यामुळे अनेक नागरिकांनी दिवसभर दागिन्यांची ऑर्डर दिली. नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून खरेदी होणार आहे. गुरुपुष्यामृत मुहूर्त कधीही असला तरी त्या दिवशी एक ग्रॅम का होईना सोने खरेदी करणारा विशिष्ट ग्राहकवर्ग आहे.