

चिकोडी : घटप्रभा नदीच्या पाणलोट क्षेत्र आणि पश्चिम घाटात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे बेळगाव जिल्ह्यातील प्रसिद्ध आणि पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेला गोकाक धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाला आहे. या धबधब्याचे विहंगम आणि अद्भुत रूप पाहण्यासाठी आता पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे.
अथांग विस्तारामुळे आणि उंचावरून कोसळणाऱ्या पाण्याच्या रौद्र रूपामुळे गोकाक धबधब्याला 'भारताचा नायगारा' म्हणून ओळखले जाते. यंदा पावसाने विलंब केल्याने हा धबधबा कोरडा पडला होता. जुलैच्या सुरुवातीला पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे घटप्रभा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. परिणामी, गोकाक येथील कड्यावरून पांढरे शुभ्र पाणी प्रचंड गर्जना करत खाली कोसळताना दिसत आहे.
धबधबा प्रवाहित झाल्याचे समजताच बेळगाव, कोल्हापूर, सांगली आणि गोव्यातून येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. धबधब्याचा आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर पर्यटकांना आकर्षित करत आहे.
खबरदारीचे आवाहन
स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. पर्यटकांनी धबधब्याच्या मुख्य पात्रात किंवा धोकादायक ठिकाणी उतरू नये, सेल्फी काढताना सुरक्षित अंतर ठेवावे आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.