बंगळूर : पुढारी वृत्तसेवा
आपला कार्यकाळ आणखी वर्षभर तरी वाढावा, यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हैसुरातील चामुंडेश्वरी देवीला साकडे घातले. म्हैसूर दसरोत्सव उद्घाटनावेळी त्यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत आश्चर्यकारक विधान केल्याने याबाबत व्यापक चर्चा सुरू झाली आहे. राज्यात काँग्रेस सरकार सत्तेवर आल्यानंतर सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांना प्रत्येकी अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद मिळणार असल्याबाबत ठरवण्यात आल्याची चर्चा सुरू होती. आता स्वत: सिद्धरामय्यांनीच याविषयी जाहीर विधान केल्याने अडीच वर्षांनी ते पदाचा राजीनामा देणार असल्याची शक्यता आहे.
म्हैसूर नगर विकास प्राधिकरणाकडून भूखंड मिळवून घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. याविरुद्ध त्यांची लोकायुक्त चौकशी आणि सक्तवसुली संचालनालयामार्फत चौकशी सुरू आहे. सुरुवातीला त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले पक्षश्रेष्ठी आणि ज्येष्ठ नेते आता गप्प आहेत. मुख्यमंत्र्यांना कोणत्याही क्षणी राजीनामा द्यावा लागण्याची शक्यता निर्माण होणार असल्याचा अंदाज सर्वांना आहे. यामुळेच सिद्धरामय्यांनी आणखी वर्षभर तरी मुख्यमंत्रिपद आपल्याकडे राहावे, असा आशीर्वाद देवीकडे मागितल्याचा तर्क लावला जात आहे.व्यासपीठावर उपस्थित निजदचे ज्येष्ठ नेते जी. टी. देवेगौडा यांचा उल्लेख करून ‘आज तू मला हरवलास’ असे उद्गार मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी काढले. देवेगौडा आणि आपण 40 वर्षांपासून राजकारणात आहोत. आजपर्यंत कोणतीही चूक केली नाही. केली असती तर दीर्घकाळ राजकारणात टिकणे शक्य झाले नव्हते. यामुळेच देवेगौडांनी आपल्याला साथ दिली आहे. आपण निर्दोष असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यामुळे आपल्याला आणखी बळ मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन केल्यानंतर ते म्हणाले, राज्यामध्ये देवराज अर्स यांच्यानंतर पाच वर्षे मुख्यमंत्रिपदी राहणारी व्यक्ती म्हणजे केवळ मीच. पुढील पाच वर्षे हे पद आपल्याकडेच राहील. कितीही अडचणी आल्या तरी चामुंडेश्वरी देवीचा आशीर्वाद आपल्याला आहे.