बेळगाव : शेतकर्‍यांना तात्काळ नुकसान भरपाई द्या

खासदार जगदीश शेट्टर; जिल्हा विकास आढावा त्रैमासिक बैठक
Belgaon News
बेळगाव : बैठकीत बोलताना जिल्ह्याधिकारी मोहम्मद रोशन. शेजारी सीईओ राहुल शिंदे, खासदार ईराण्णा कडाडी, खासदार जगदीश शेट्टर, खासदार प्रियांका जारकीहोळी, आमदार विठ्ठल हलगेकर.Pudhari Photo
Published on
Updated on

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या सर्व शेतकर्‍यांना भरपाई देण्यात यावी. तसेच सर्वेक्षण न झालेल्या शेतकर्‍यांनाही भरपाई द्यावी, अशा सूचना खासदार जगदीश शेट्टर यांनी अधिकार्‍यांना दिल्या. जिल्हा पंचायत सभागृहात शुक्रवारी जिल्हा विकास त्रैमासिक बैठक झाली. यावेळी खासदार शेट्टर बोलत होते. ते पुढे म्हणाले, सर्वेक्षणाचे काम पूर्ण करून लवकरात लवकर शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्याचे काम हाती घ्यावे. पावसामुळे खराब झालेले रस्ते व पुलांची दुरुस्ती, पीक खरेदी केंद्रांवरील पिकांच्या खरेदीची प्रक्रिया तात्काळ सुरू करण्यात यावी.

महापालिकेच्या अमृत योजना 1 व 2 अंतर्गत जागा वाटपासाठी सादर केलेले प्रस्ताव मार्गदर्शक तत्त्वांनुसार तयार करून प्रस्तावाशी संबंधित अधिकार्‍यांशी समन्वय साधावा. प्रधानमंत्री आवास योजनेंतून बांधण्यात येणार्‍या घरांचे काम लवकर सुरू करावे. गरीब जनतेच्या सोयीसाठी शासनामार्फत राबविण्यात येणार्‍या विविध गृहनिर्माण योजनांतर्गत सुरू असलेली कामे तातडीने सुरू करण्यात यावीत. शीतकरण केंद्रे सुरू करण्यावर भर देवून जिल्ह्यातील कृषी व फलोत्पादन विभागामार्फत संयुक्त सर्वेक्षण करावे. जिल्ह्यातील महत्त्वाची कृषी, बागायती पिके, फुले व फळे यांच्या उत्पादनाची निश्चित आकडेवारी उपलब्ध करावी.

जिल्ह्याचा शैक्षणिक व साक्षरतेचा दर वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. चालू शैक्षणिक वर्षात जिल्ह्यातील दहावी व पीयूसीचे निकाल सुधारण्याकडे लक्ष द्यावे. रोजगार हमी योजनेंतर्गत काम करणार्‍या मजुरांना मुदतीत काम देण्यात यावे. कित्तूर औद्योगिक क्षेत्राची माहिती मिळवून औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रिया राबवावी. जिल्ह्यातील उद्योग व्यवसायाचा वेग वाढवावा, अशा सूचना दिल्या. राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी म्हणाले, काही भागात गोशाळा उघडल्या गेल्या नाहीत. जनावरांना चारा पुरवठा होत नसल्याच्या तक्रारी आहेत. तसेच गोकाक व मुडलगी येथे सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यात यावीत. ग्रामीण भागात शासकीय रुग्णालये सुरू करण्यापूर्वी डॉक्टर, कर्मचारी नियुक्ती, आवश्यक साहित्याची व्यवस्था करूनच सुरू करावीत. जेणेकरून जनतेला आरोग्य सेवा देण्यात कोणतीही अडचण येणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन म्हणाले, अतिवृष्टीबाबत सर्वेक्षण पूर्ण झाले असून लाभार्थ्यांची माहिती संबंधित ग्रामपंचायती व कृषी केंद्रांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. काही आक्षेप असल्यास दुरुस्त करून अंतिम यादी जाहीर करण्यात येईल. सरकारच्या सूचनेनुसार शेतकर्‍यांना नुकसान भरपाईची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. शाळा व अंगणवाडी इमारतींच्या दुरुस्तीसाठी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सूचनांनुसार अनुदान व दुरुस्तीची कार्यवाही केली जाईल. यावेळी खासदार प्रियांका जारकीहोळी, आमदार राजू सेठ, विठल हलगेकर, जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे आदीसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

राज्यशिष्टाचार भंग प्रस्ताव मांडणार

खा. शेट्टर यांनी ग्रामीण विधानसभा मतदारसंघात केंद्राकडून मंजूर करण्यात आलेल्या विकासकामांना प्रारंभ करताना आपणास डावलण्यात येत आहे. राजशिष्टाचाराचा भंग करण्यात येत आहे. याप्रकरणी लोकसभेत राजशिष्टाचारभंग प्रस्ताव मांडण्याचा इशारा दिला.

शेतकरी, व्यापार्‍यांची बैठक घ्या

बेळगावातील भाजी व फळांना मोठी मागणी आहे. यासाठी जिल्ह्यातील शेतकरी व व्यापार्‍यांची बैठक घेऊन त्यांच्यासोबत चर्चा करावी. फळांची बाजारपेठ वाढविण्याकडे लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना खासदार शेट्टर यांनी केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news