

बेळगाव : अपघातात किरकोळ जखमी पतीच्या सलाईनमध्ये विष मिसळून त्याचा खून केल्याप्रकरणी पत्नी व तिच्या प्रियकराला पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. परंतु, आता या प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे. उत्तरीय तपासणीवेळी न्यायवैद्यक अहवालात पोटात गेलेले विष येऊ नये, यासाठी फॉरेन्सिक लॅबमधील तिघांसह अन्य काहीजणांना हाताशी धरून हा अहवालच दाबला असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे, पोलिसांनी एकेक कडी जोडत तब्बल नऊजणांना अटक केली.
हा सर्व प्रकार मृत निवृत्त लष्करी जवान संदीप कलगौडा मंजरगी (वय ४६) याच्या नावे एचडीएफसी व एसबीआय बँकेत उतरविलेल्या दोन कोटी रुपयांच्या विमा रकमेसाठी रचल्याचे दिसून येते. परंतु, पोलिसांनी अद्याप याला दुजोरा दिलेला नाही.
पोलिसांनी यापूर्वी सुमा संदीप मंजरगी (४०, रा. घोडगेरी) व तिचा प्रियकर पुंडलिक विठ्ठल डोंबर (३३, रा. घोडगेरी) यांना अटक केली. त्यांनी विष पाजले असले तरी त्यांना मदत करणाऱ्या सातजणांनाही पोलिसांनी अटक केली. यामध्ये आप्पासाब नाईकवडी, चन्नय्या ऊर्फ चन्नाप्पा अडवीस्वामीमठ, नागराजू पी. एम., अशोक गुजनाळ, बसवराज भस्मे, राहुल जोगी व सचिन शेलार यांचा समावेश आहे. या प्रकरणाचा छडा यमकनमर्डीचे पोलिस निरीक्षक जावेद मुशापुरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी लावला. त्याची सविस्तर माहिती जिल्हा पोलिसप्रमुख के. रामराजन यांनी सोमवारी (दि. १५) पत्रकारांना दिली.
ओळखीतून बनली टीम
संशयित सुमा मंजरगीच्या आईच्या ओळखीचा राजू ऊर्फ बसवराज भस्मे होता. तिने आपल्या मुलीची ओळख भस्मेशी करून दिली. संदीपचा मृत्यू झाल्यानंतर भस्मेने हे प्रकरण दाबण्यासाठी कुणाला भेटायचे याची टीप दिली. त्यानुसार सुमा व पुंडलिक पोलिस आयुक्तालयातील प्रथम दर्जा साहाय्यक अशोक गुजनाळला जाऊन भेटले. त्याने ऑटोनगरमधील एफएसएलमधील शिपाई आप्पासाब नाईकवडी याची भेट घेण्यास सांगितले. आप्पासाबने चन्नय्या ऊर्फ चन्नाप्पा याची भेट घडवून दिली. चन्नाप्पाने त्याचा वरिष्ठ नागराजू पी. एम. याची भेट घालून दिली. त्याने याचा अहवाल देताना विषामुळे मृत्यू झाल्याचे कुठेही नमूद केले नाही. त्यामुळे, हा अपघात ठरवून संदीपवर तीन महिन्यांपूर्वी दफनविधी केला.
औषध अन् धमकी देणाराही अटकेत
याप्रकरणी राहुल जोगी व सचिन शेलार या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. राहुल हा सुमाचा प्रियकर पुंडलिकचा नातेवाईक आहे. तो सध्या घटप्रभा येथील हॉस्पिटलमधील मेडिकलमध्ये काम करतो. सलाईनमध्ये कोणते औषध घातल्यानंतर रुग्णाला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो, याची युक्ती देणारा राहुल आहे. त्याने मेडिकलमधील औषध स्वतःच देत हे सलाईनमध्ये मिसळा, संदीपना हृदयविकाराचा झटका येईल, हे सांगितले. त्यानुसार त्यांनी केले. दुसरा संशयित सचिन हा पुंडलिकचा मित्र आहे. दोन कोटींची विम्याची रक्कम येणार म्हटल्यानंतर पुंडलिक हा सतत महिलेकडे जाऊन पैशाची मागणी करत होता. शिवाय, तिला अनेकदा धमकी देऊनही रक्कम उकळत होता. यावेळी तो साथीला सचिनला घेऊन जात होता. त्यामुळे, त्याच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे.
विम्याची वाटणी कशी?
दोन ठिकाणी असलेल्या विम्याची दोन कोटींची रक्कम येणार असल्याने यामधील प्रत्येकाच्याच तोंडाला पाणी सुटले होते. यामध्ये वाटणी कशी होणार होती, याबाबत पोलिसप्रमुखांना विचारले असता हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. यामध्ये आणखी काही संशयित असून त्यांनाही लवकरच ताब्यात घेतले जाणार आहे. त्यानंतरच या प्रकरणातील आणखी काही महत्त्वाचे दुवे समोर येणार असल्याचे त्यांनी सांगितले.