

बेळगाव : बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत बससेवेची सुविधा देण्याची योजना सरकारने आखली आहे. पहिल्या टप्प्यात बंगळूर व जवळच्या विभागात ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे, असे परिवहन मंत्री रामलिंग रेड्डी यांनी सांगितले आहे.
सरकारने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले आहे. सर्व बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, जीपीएस ट्रॅकिंग प्रणाली राहणार असून प्रत्येक बसमध्ये बाल सहाय्यता क्रमांक 1098 स्पष्टपणे लिहिणे बंधनकारक आहे. बसचा मार्ग आणि वेळेचे काटेकोर पालन करण्यावर भर दिला जाणार आहे.
ग्रामीण भागांमध्ये शाळा व महाविद्यालयांसाठी विशेष बससेवा सुरू केली जाणार आहे. शाळांच्या वेळेनुसार सकाळी व सायंकाळी फेऱ्यांचे नियोजन करण्यात येणार आहे. बससेवेच्या मार्गाचे पालन व वेळेचे व्यवस्थापन यावरही विशेष भर देण्यात येणार आहे.