

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा; जम्मू-काश्मीरच्या (Jammu and Kashmir) पूंछ जिल्ह्यात मंगळवारी संध्याकाळी नियंत्रण रेषेजवळ झालेल्या लष्कराच्या वाहन अपघातात एकूण पाच जवान शहीद झाले. यातील चार जवान कर्नाटकातील असल्याची माहिती मिळाली आहे. एका जवानांची ओळख पटवण्याचे काम अद्याप काम सुरू आहे. तर एकजण गंभीर जखमी आहे. चारपैकी दोन जवान बेळगाव जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळाली आहे.
बेळगावमधील पंत बाळेकुंद्री येथील सुभेदार दयानंद तिरकणवर (45), चिक्कोडी तालुक्यातील कुप्पनवाडी गावातील धर्मराजा सुभाष खोत हे दोन जवान बेळगाव जिल्ह्यातील आहेत. उडुपी जिल्ह्यातील कुंदापूरजवळील कोटेश्वरच्या बिजाडी येथील अनूप (वय 33) आणि बागलकोट जिल्ह्यातील महालिंगपुर येथील महेश मेरीगोंडा (वय 25) अशी शहीद जवानांची नावे आहेत. पाच पैकी चार जवान कर्नाटक राज्यातील असल्याची माहिती आतापर्यंत हाती आली आहे.
दयानंद तिरकण्णवर यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. पूंछ जिल्ह्यातील मेंढर भागातील बालनोई भागात लष्कराचे एक वाहन ३५० फूट खोल दरीत कोसळून अपघात झाला होता.