Belgaum News: चारा-पाण्याची टंचाई; वन्यप्राण्यांची शिवारांत चढाई

पश्चिम भागात वाढत्या घटना : पिकांचे नुकसान, वनखाते उदासीन, शेतकरी हतबल
Belgaum News
Belgaum News: चारा-पाण्याची टंचाई; वन्यप्राण्यांची शिवारांत चढाईPudhari
Published on
Updated on

बेळगाव : वाढत्या उन्हामुळे डोंगर आणि वनक्षेत्रात चारा-पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे, चारा-पाण्याच्या शोधात वन्यप्राणी शिवारात फिरु लागले आहेत. गवेे, रानडुकर, साळींद्र, तरस, मोर आदींचा त्यात समावेश आहे.

पश्चिम भागातील सीमाहद्दीवर असलेल्या कुद्रेमानी, बाची, बेकिनकेरे, बसुर्ते, कोनेवाडी, अतिवाड यासह चंदगड तालुक्यातील देवरवाडी, सुंडी, महिपाळगड, होसूर, कौलगे आदी परिसरात वन्यप्राण्यांचा मुक्त संचार वाढला आहे. दिवसाढवळ्याही वन्यप्राणी शिवारात फिरु लागले आहेत. दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. त्यामुळे, डोंगर क्षेत्रातील चारा सुकून गेला आहे. शिवाय पाण्याचा तुटवडाही निर्माण होत आहे. परिणामी वन्यप्राणी सैरभैर होऊन डोंगर पायथ्याशी असलेल्या शिवारात संचार करु लागले आहेत.

कर्नाटक-महाराष्ट्र सीमाहद्दीवर 25 ते 30 गव्यांचा कळप धुमाकूळ घालत आहे. यामध्ये रब्बी हंगामातील बटाटा, रताळी, मका, भूईमूग, जोंधळा यासह भाजीपाला पिकाला फटका बसला आहे. वनखाते दाद देत नाही आणि लोकप्रतिनिधी लक्ष देत नाहीत, त्यामुळे कोणाकडे गाऱ्हाणे मांडावेत, अशा प्रतिक्रिया नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. शेतकरी महिला शेती कामात दिवसभर दंग असतात. मात्र, वन्यप्राणी दिवसाढवळ्या फिरत असल्याने भिती निर्माण झाली आहे.

कोणताही अनुचित प्रकार घडण्यापूर्वी उपाययोजना राबवाव्यात. वन्यप्राणी शिवारात येऊ नयेत म्हणून डोंगर क्षेत्रात चारा-पाण्याची व्यवस्था करावी. डोंगर क्षेत्रात लहान तलाव निर्माण करुन त्यामध्ये पाणी उपलब्ध करावे, अशी मागणी होत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news