

बेळगाव : फलोत्पादन खाते तसेच ग्रामीण व लघुउद्योग विभागातर्फे ह्युम पार्कमध्ये आयोजित 66 व्या फळ व पुष्प प्रदर्शनाची सांगता रविवारी (दि. 14) झाली. तीन दिवस चाललेल्या या प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळाला. हजारो लोकांसह शेतकऱ्यांनी प्रदर्शनाला भेट देऊन खरेदीचा आनंद लुटला. या प्रदर्शनात सर्व प्रकारच्या फुलांची रोपे, फळे, फळ व पालेभाज्या, शेतीसाठी आधुनिक उपकरणे, बियाणे, खते, खाद्य उत्पादने आदींचे स्टॉल्स मांडण्यात आले होते.
प्रदर्शनाला शुक्रवारपासून (दि. 12) प्रारंभ झाला होता. प्रदर्शनात बागप्रेमी, फळप्रेमी व शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारचे स्टॉल्स होते. फुलांच्या विविध रोपांचे अनेक स्टॉल्स मांडण्यात आले होते. त्यात गुलाबाच्या प्रजातींची संख्या सर्वाधिक होती. एका स्टॉलवर 19 प्रकारच्या गुलाबांच्या प्रजाती मांडण्यात आल्या होत्या. याशिवाय टेरेस गार्डनसाठी रोपे, विविध प्रकारच्या कुंड्या, विविध प्रकारचे बोन्साय, शोभेची रोपे, माती, खते, औषधे आदींचेही स्टॉल होते. याठिकाणी रोपांची लागवड व घ्यावयाची काळजी याबाबतही माहिती दिली जात होती. फुलांच्या रोपांच्या स्टॉल्सवर महिलांची अधिक गर्दी दिसून येत होती.
शेतकऱ्यांसाठीही प्रदर्शनात खूप काही होते. शेतीची आधुनिक अवजारे, बियाणे, खते, औषधे आदींची विक्री व माहिती देण्यासाठी 12 स्टॉल्स होते. याशिवाय फळ व भाज्यांचे विविध प्रकारही उपलब्ध होते. आधुनिक व सेंद्रिय शेतीबद्दल मार्गदर्शनही करण्यात आले. त्यामुळे, या स्टॉल्सना शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळाला. गेले तीन दिवस रोज दुपारी चार ते नऊपर्यंत मनोरंजनाचे कार्यक्रम झाले. त्याचा लाभ प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांनी घेतला. तीन दिवसांत हजारो लोकांनी प्रदर्शनाचा लाभ घेतला.