

बेळगाव : गेल्या दोन दिवसांच्या तपासात आदित्यराज कॅपिटलमध्ये झालेल्या चौकशीत आरबीआय व सेबीच्या नियमांचे उल्लंघन करून ठेवी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे संस्थापक सीईओ बलराज माने याच्यासह सहाजणांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. संस्थापकाने देश सोडू नये, यासाठी त्याला लूकआऊट नोटीस बजावली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन व पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांनी शनिवारी (दि. ६) संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या आदित्यराज कॅपिटलच्या एकूण तपासाबाबत माहिती देण्यासाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. जिल्हाधिकारी म्हणाले, आदित्यराज कॅपिटलने लेव्हरेज फंडिंग ॲग्रीमेंट करत गुंतवणूकदारांना दरमहा पाच टक्के परतावा देण्याचे आश्वासन दिले आहे. हे सहकार कायदा, आरबीआय व सेबीच्या कोणत्याही नियमात बसत नाही. १ जून रोजी मी या कंपनीची चौकशी करण्याचे आदेश प्रांताधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार याची चौकशी झाली आहे. याचा सविस्तर अहवाल प्रांताधिकारी व पोलिस आयुक्तांकडून मला प्राप्त झाला आहे. त्यात या कंपनीचे आक्षेपार्ह व्यवहार आढळून आले आहेत.
आतापर्यंतच्या तपासात या कंपनीत सुमारे सात हजारजणांनी गुंतवणूक केली आहे. गुंतवणुकीची रक्कम ५० कोटींहून अधिक असल्याने हे प्रकरण सीआयडीकडे सोपविले जाणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
पोलिस आयुक्त भूषण बोरसे म्हणाले, त्यांची वेबसाईट फॉरमॅट केल्याने माहिती मिळण्यात तांत्रिक अडचणी येत होत्या. परंतु, बहुतांश माहिती जमा केली आहे. याचा प्रमुख बलराज माने हा देशाबाहेर जाऊ नये म्हणून लुकआऊट नोटीस बजावली आहे. तो कुठे आहे, याची माहिती मिळाली असून, त्याच्या तपासासाठी दोन पथके रवाना केली आहेत. गुन्हा दाखल झालेल्या संशयितांपैकी एकही तपासाला व्यवस्थित प्रतिसाद देत नसल्याचे आयुक्तांनी सांगितले.
कंपनीसह सात जणांवर गुन्हा
गुंतवणूकदारांच्या रकमेचे संरक्षण करण्यासाठी कायदा आहे. तो म्हणजे केपीआयडी व बडस् ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करून संशयास्पद असलेल्या कोणत्याही संस्थेची चौकशी करता येते. या कायद्यांतर्गत आदित्यराज कॅपिटलवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये आदित्यराज कॅपिटल प्रा. लि., आदित्यराज ग्लोबल कमॉडिटीज प्रा. लि., आदित्यराज सिक्युरिटीज प्रा. लि. या तीन कंपन्यांचा समावेश आहे. याशिवाय संस्थापक सीईओ बलराज रोहीदास माने, राष्ट्रीय विक्रीप्रमुख संदीप गिरीधर, स्ट्रॅटेजिक हेड तानिया सोनी अरोरा, झोनल उपाध्यक्ष विशाल भगत, अन्सुल उपूल, प्रिन्सिपल ऑफिसर अमीत कौरव व अन्य यांचा समावेश आहे. या सर्वांविरोधात सहकार संघाचे साहाय्यक निबंधक जबीउल्ला के. यांनी फिर्याद दिली आहे.