

खानापूर : वन्यजीव आणि वनसंपदेच्या जतनासाठी वनखाते जीव तोडून प्रयत्न करत असतानाच रेल्वेची धडक आणि वीजभारित तारांचा स्पर्श यासारख्या कारणांमुळे हत्ती, बिबटे, गवे अशा वन्यजीवांचा हकनाक बळी जात आहे. अपघाताच्या घटनांमध्ये गेल्या पंधरा वर्षात तब्बल 10 हत्तींचा बळी गेला आहे. त्यामुळे वनखात्याने वन्यजीव संवर्धन दृष्टिकोन आणि कार्यपद्धतीत बदल करण्याची गरज व्यक्त होत आहे.
तालुक्यात गेल्या दोन दशकांपासून मानव-हत्ती संघर्ष सुरू आहे. गेल्या 25 वर्षांत तालुक्यात हत्तींनी 15 जणांचा बळी घेतला आहे. त्यात शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. गेल्या दीड महिन्यांपासून दहा हत्तींनी तालुक्याच्या दक्षिण आणि पूर्व भागाला हैराण करुन सोडले असताना वनखात्याने सतर्कतेचा इशारा देण्यापलीकडे काहीच केलेले नाही.
गोलीहळ्ळी वनविभागात 10 ऑक्टोबर 1997 रोजी तालुक्यातील हत्तींच्या हल्ल्यातील पहिला बळी गेला होता. त्याच दिवशी अन्य एकाचाही बळी गेला. तत्पूर्वी तालुक्यातील शेतकरी हत्तीला देवाचा अवतार समजून पूजा करायचे. 1997 नंतर आजतागायत 15 जणांचा हत्तींच्या हल्ल्यात बळी गेला आहे तर अनेकजण जायबंदी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. हत्तींच्या हल्ल्यात शेतकऱ्यांचा बळी जाण्याच्या दुर्दैवी घटना घडत असतानाच आतापर्यंत 10 हून अधिक हत्तींना जीव गमवावा लागला आहे. 2007 मध्ये मोदेकोप शिवारात दोन हत्तींचा संशयास्पद मृत्यू झाला. त्यानंतर नागरगाळी परिसरात हत्तींच्या मृत्यूच्या तीन घटना उघडकीस आल्या. अशोकनगरमध्ये वीजेच्या तारेला स्पर्श झाल्याने एका टस्कराचा मृत्यू झाल्याची घटना पाच-सहा वर्षांपूर्वी घडली होती. तालुक्यात हत्तींनी केलेल्या पिकांच्या नुकसानीची मोजदाद नाही. शेतकरी मेटाकुटीस आले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हत्तींचे कळप पूर्वी सडा-मान या गावांच्या हद्दीतून कणकुंबी वनविभागात प्रवेश करीत. हल्ली तेथील हत्तींचा वावर बऱ्यापैकी कमी झाला आहे. दांडेली अभयारण्यातील हत्तींचे कळप नागरगाळी वनविभागातून तालुक्यात प्रवेश करतात. 2005 मध्ये हत्ती समस्येवर तोडगा काढण्यासाठी ‘इलिफंट गो बॅक’ ही महत्वाकांक्षी योजना महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारने संयुक्तरित्या अंमलात आणली. पण, सुरु होण्याआधीच तिचा बोजवारा उडाला. त्यानंतर 2007 मध्ये सिंधुदुर्ग आणि दांडेलीतून येणाऱ्या हत्तींना अटकाव करण्यासाठी सीमेवर चरी खोदण्यात आल्या. हत्तींनी चरीत झाडे आणि दगड टाकून सीमा ओलांडली. सौर कुंपणाच्या योजनेचे तर तीनतेरा वाजले. म्हैसूरमधील लक्ष्मी हत्तीणीकडून जंगली हत्तींना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केविलवाणा ठरला. पण, त्याचा काही उपयोग झालेला नाही. हत्ती समस्येपुढे वनखाते पूर्णपणे हतबल झाले आहे.
हत्तींची शिकार, मानवाला हानीकारक ठरणारे वर्तन व संरक्षण या विषयांवर काम करण्यासाठी केंद्र सरकारने डॉ. महेश रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली विशेष हत्ती टास्क फोर्स नेमले. या पथकाने हत्ती प्रकल्पाची रुपरेषा आखून अंमलबजावणीची पद्धती व खर्चाचा आराखडा सूचना-शिफारशींसह सादर करायचा होता. हत्तींसाठी स्वतंत्र अभयारण्य उभारुन हत्तींच्या संवर्धनाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. तशी शिफारसदेखील टास्कफोर्सने 10 वर्षांपूर्वी केली आहे.