

गुलबर्गा : एकविसाव्या शतकातील पहिले पाव शतक संपत आले आणि शिक्षणाचा प्रसार खेडोपाडी पोहोचलेला असला तरी जातीपातीच्या भिंती अजूनही तशाच असल्याचे दाखवणारा प्रकार उघडकीस आला आहे. दुसर्या जातीतील युवकाशी प्रेम करणार्या मुलीचा बापानेच खून केला आहे. त्याला या कृत्यात त्याच्या भावाने तसेच एका नातेवाईकाने मदत केली. या तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.
गुलबर्गा जिल्ह्यातील मेळकुंदा गावात ही घटना घडली असून कविता कोळ्ळूर असे युवतीचे नाव आहे. शंकर कोळ्ळूर असे तिच्या बापाचे नाव आहे. त्याला तसेच त्याचा भाऊ म्हणजे कविताचा काका शरणू आणि नातेवाईक दत्ताप्पा अशा तिघांना फरहताबाद पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कविताचे गावातीलच एका अन्य जातीतील युवकावर प्रेम जडले होते. पीयूसी कॉलेजला तो मुलगा येत होता. तीन-चार महिन्यांपूर्वी त्यांच्या प्रेमाची कुणकुण कविताच्या कुटुंबाला लागली होती. त्यामुळे तिचे कॉलेजही बंद केले होते.
कविताने मात्र ‘लग्न करेन तर त्याच्याशी, अन्यथा पळून जाईन’ असा पवित्रा घेतला होता. त्यामुळे संतापलेल्या बापाने शनिवारच्या मध्यरात्री भाऊ शरणू व नातेवाईक दत्तू यांच्या सहाय्याने तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर तिच्या अंगावर कीटकनाशक फवारून विष पाजले. त्यानंतर सकाळी गावाच्या बाहेरील एका नातेवाईकाच्या शेतात तिचा मृतदेह जाळण्यात आला.
पोलिस तपासादरम्यान कोळ्ळूर यांचे हे भयानक कृत्य उघडकीस आले. फरहताबाद पोलिसांनी स्वतःहून तक्रार दाखल केली आणि तिघा संशयितांना अटक करण्यात आली. शहर पोलिस आयुक्त डॉ. शरणप्पा एस. डी., पीआय मंजुनाथ इक्कळकी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.