Belgaum Farmers Foot March : पदयात्रा बेळगावात; आज हुबळीकडे

जिल्‍हाधिकार्‍यांनी घेतली भेट; केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या निवासस्थानासमोर आंदोलनाचा निर्धार
Belgaum Farmers Foot March : पदयात्रा बेळगावात; आज हुबळीकडे
Published on: 
Updated on: 

बेळगाव : उसाला योग्य दर मिळावा, एमएसपी ३१ वरून ६० रुपये करण्यात यावा आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात या मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी बुधवारपासून (दि. १४) सुरू केलेली पदयात्रा गुरुवारी (दि. १५) बेळगाव दाखल झाली. शुक्रवारी बेळगावमधील सुवर्णसौध येथून कित्तूरमार्गे हुबळीकडे पदयात्रा निघणार आहे. हुबळी येथे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या निवासस्थानासमोर अहोरात्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी तब्बल ३१ तास राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला होता. त्यानंतरही मागण्यांबाबत ठोस निर्णय न झाल्याने आता पदयात्रेच्या माध्यमातून आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महामार्गावरील आंदोलनानंतर आता केंद्रीय मंत्र्यांच्या निवासस्थानाला घेराव घालून मागण्यांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्याची रणनीती शेतकऱ्यांनी आखली आहे. एमएसपी ३१ वरून ६० रुपये करण्यासह स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू होईपर्यंत माघार घेणार नसल्याचे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

शेतकऱ्यांबरोबर जिल्‍हाधिकार्‍यांची चर्चा

पदयात्रा बेळगावमध्ये दाखल झाल्यानंतर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी शेतकरी नेते चुन्‍नाप्पा पुजारी आणि राजू पोवार यांनी आपल्या मागण्या मान्य झाल्यास तातडीने आंदोलन मागे घेण्याची तयारी दर्शवली. तसेच आंदोलनादरम्यान प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार आणि प्रशासन असल्याचे सांगत जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी चर्चा आणि समन्वयातून हा प्रश्न सोडविण्याचे आवाहन केले. सर्वांनी एकत्रितपणे चर्चा करून तोडगा काढावा, अशी विनंती त्यांनी केली. यावेळी पोलिस आयुक्त प्रकाश निकम उपस्थित होते. दरम्यान, मागण्यांवर ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका शेतकऱ्यांनी कायम ठेवली आहे. त्यामुळे शुक्रवारी सुवर्णसौध येथून सुरू होणाऱ्या पदयात्रेकडे आणि त्यानंतर हुबळीत होणाऱ्या आंदोलनाकडे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news