

बेळगाव : गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या एपीएमसी भाजी मार्केट आणि जय किसान खासगी भाजी मार्केटमधील वाद चिघळला आहे. व्यापारी आणि शेतकर्यांनी चन्नम्मा चौकात चक्काजाम करून पावसातही आंदोलन सुरूच ठेवले होते. जय किसान खासगी भाजी मार्केटवर तत्काळ कारवाई करावी; अन्यथा आम्ही येथून हलणार नाही, अशी भूमिका शेतकर्यांनी घेतली.
शेतकरी आणि व्यापारी मोठ्या संख्येने गुरुवारी (दि.25) चन्नम्मा चौकात जमा झाले होते. शेतकरी ट्रॅक्टर, बैलगाडी घेऊन मोर्चात सहभागी झाले होते. जय किसान खासगी मार्केटवर कारवाई करा, एपीएमसी भाजी मार्केट आमचे हक्काचे आहे, खासगी भाजी मार्केट बंद करा, अशी मागण्या करत शेतकर्यांनी परिसर दणाणून सोडला होता.
चुनाप्पा पुजेरी म्हणाले, गत साडेतीन वर्षांपासून आम्ही जय किसान खासगी भाजी मार्केटविरोधात आवाज उठविला आहे. मुख्यमंत्री सिद्धराम्मया यांच्याशी भाजी मार्केटबाबत चर्चा झाली होती. एपीएमसीत कोट्यवधी रुपये खर्चून हायटेक भाजी मार्केट उभारले आहे. एपीएमसी भाजी मार्केट शेतकर्यांचे आहे. या ठिकाणी शेतकर्यांना योग्य भाव दिला जातो. शेतकर्यांच्या अडचणी समजावून घेतल्या जातात. त्यामुळे जय किसानवर तत्काळ कारवाई करावी. यावेळी प्रकाश नायक, अॅड. अमर यळ्ळूरकर, अॅड. सुधीर चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते सुजिद मुळगुंद, एपीएमसी माजी अध्यक्ष शिवनगौैडा पाटील आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन म्हणाले, कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न करत आहे. रस्त्यावर बसून जेवण करू नका, रस्ते अडविणे योग्य नाही. सर्वसामान्य जनतेला त्याचा त्रास होता कामा नये. जवळच हॉस्पिटल असल्याने याचा त्रास रुग्णांना होतो. कार्यालय आवारात भरपूर जागा आहे. सायंकाळपर्यंत योग्य तोडगा काढू.
जिल्हाधिकार्यांच्ना आश्वासनानंतर आंदोलनस्थळी शेतकर्यांनी मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला. चन्नम्मा चौकात आंदोलन सुरू होते. त्यामुळे वाहतूक अन्य मार्गाने वळवावी लागली. वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी पोलिसांना मोठे परिश्रम घ्यावे लागले. यावेळी पोलिस आयुक्त भूषण बोरसे, पोलिस उपायुक्त नारायण बरमणी आदी उपस्थित होते.
जय किसान भाजी मार्केट तात्काळ बंद करा, अन्यथा महामार्ग अडवू, असा इशारा शेतकर्यांनी दिली. त्यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन म्हणाले, शेतकर्यांना न्याय दिला जाईल. मला थोडा वेळ द्या. योग्य तोडगा काढला जाईल. सर्वसामान्यांना त्रास होईल, असे कोणतेही कृत्य करू नका. शेतकर्यांना न्याय दिला जाईल.
व्यापारी, शेतकरी भर पावसात चन्नम्मा चौकात आंदोलन करत होते. यावेळी जिल्हाधिकारी रोशन म्हणाले, सकाळपासून उन होते. पण, शेतकर्यांना त्रास होईल, म्हणून पावसाने आशीर्वाद दिला आहे. गेल्या दहा दिवसापासून प्रशासन काम करत आहे. शेतकर्यांना कोणताच त्रास होऊ नये, हीच भूमिका आमची आहे.