

कोगनोळी : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कोगनोळी टोलनाक्यावर शुक्रवारी (दि. 6) सकाळी दहाच्या सुमारास काही काळ तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. टोलनाक्याच्या आसपासच्या गावातील चारचाकी वाहनचालकांकडून टोल आकारला जातो. त्यातून स्थानिकांना वगळावे, अशी मागणी करत त्यांची मागणी होती. शनिवारपर्यंत (दि. 7) तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
कोगनोळी टोलनाक्याच्या आसपासच्या सुमारे 2 ते 20 कि. मी. परीघातील गावातील चारचाकी वाहनधारकांकडून टोल वसूल केल्याशिवाय सोडले जात नाही. गेल्या अनेक दिवसांपासून याप्रश्नी वाहनधारकांची हेळसांड व कुचंबणा होत आहे. परिसरातील शेतकरी व वाहनधारकांना? ? शेतीसह अन्य कामासाठी जाताना टोल पार करून जावे लागते. अनेक विद्यार्थ्यांना शाळांना जाताना टोल पार करुन जावा लागतो. त्यामुळे, त्यांना अडचणीचे बनले आहे.
शुक्रवारी कोगनोळी गावातील अनेक वाहनधारकांनी राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यावर आपली वाहने घेऊन जाऊन टोल अधिकार्यांकडे विचारणा केली. टोलनाक्यावर काही काळासाठी रहदारीची कोंडी निर्माण होऊन वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. संबंधित अधिकार्यांनी टोलमध्ये सूट देण्याबाबत वरिष्ठ अधिकार्यांशी चर्चा करुन तोडगा काढण्याची आश्वासन दिले.