Belgaum Murder Case | माजी सैनिक हत्या प्रकरण : पोलिस कर्मचारी, प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांची चौकशी

आणखी काहीजणांना अटक होण्याची शक्यता
Crime News
Murder Case Pudhari
Published on
Updated on

बेळगाव : हुक्केरी तालुक्यातील घोडगेरी येथील माजी सैनिक संदीप मंजरगी यांच्या खून प्रकरणाच्या तपासात धक्कादायक बाबी समोर येत असून, पुरावे नष्ट करण्यासाठी काही पोलिस कर्मचारी तसेच फॉरेन्सिक प्रयोगशाळेतील कर्मचाऱ्यांनी मदत केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी संबंधितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून आणखी काही जणांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

यमकनमर्डी पोलिस ठाण्याचे निरीक्षक जावेद मुशाफिरी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने माजी सैनिक संदीप मंजरगी (वय ४६) यांच्या मृत्यूचा तपास पुन्हा सुरू केल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला. विम्याची रक्कम मिळविण्याच्या उद्देशाने पत्नी सुमा मंजरगी आणि तिचा प्रियकर पुंडलिक डोंबर यांनी सलाईनमधून विषारी द्रव्य देऊन संदीप यांची हत्या केल्याचा आरोप असून या दोघांना अटक करण्यात आली आहे. सध्या त्यांची रवानगी हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.

संदीप मंजरगी यांच्या मृत्यूनंतर हा प्रकार अपघाती मृत्यू असल्याचे भासविण्यात आले होते. त्यानंतर अंत्यसंस्कारही करण्यात आले होते. मात्र तपासादरम्यान संशय निर्माण झाल्याने पोलिसांनी मृतदेह उकरून तपासासाठी प्रयोगशाळेकडे पाठविला आहे. दरम्यान, यापूर्वी झालेल्या शवविच्छेदन अहवालात विषप्रयोगाचा उल्लेख का झाला नाही, याचा तपास करताना काही धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्राथमिक चौकशीत पुरावे दडपण्याचा आणि तपासाची दिशा भरकटविण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

या प्रकरणात जिल्हा पोलिस कार्यालयातील एका कर्मचाऱ्यासह फॉरेन्सिक प्रयोगशाळेतील काही कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. अटक होण्यापूर्वी संशयित पुंडलिक डोंबर याने एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याने मयत संदीप मंजरगी यांच्याशी असलेले संबंध, संदीप यांच्या पत्नी सुमासोबतची जवळीक तसेच खून घडण्यापूर्वीच्या काही घटनांचा उल्लेख केल्याचे समोर आले आहे. संदीप यांचा काटा काढण्यासाठी विषारी द्रव्य कशाप्रकारे मिळविण्यात आले. यासंदर्भातील काही धक्कादायक दावेही त्याने या व्हिडिओत केल्याची माहिती तपास यंत्रणांकडून मिळाली आहे. पोलिसांनी हा व्हिडीओ तपासासाठी ताब्यात घेतला असून त्याची सत्यता पडताळली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news