

बेळगाव : अपघातात किरकोळ जखमी झालेल्या पतीचा अपघातातच मृत्यू झाल्याचे भासवण्यासाठी पत्नीने अघोरी उपाय वापरला. त्याच्यावर उपचार सुरू असताना लावलेल्या सलाईनमध्ये चक्क कीटकनाशक मिश्रण करून पतीचा जीव घेतला. पत्नीने तिच्या प्रियकराने केलेल्या या कृतीची कबुली दिली असली, तरी पोलिसांकडून अधिक सखोल तपास सुरू आहे. अनैतिक संबंधातील अडथळा दूर करणे व विम्याच्या रकमेसाठी हे कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे.
घटप्रभा पोलिस ठाण्याच्या हद्दीत तीन महिन्यांपूर्वी घडलेल्या या घटनेचा आता उलगडा झाला आहे. संदीप मंजरगी (वय ४६, रा. घोडगेरी, ता. हुक्केरी) असे या प्रकरणात बळी गेलेल्या दुर्दैवी माजी सैनिकाचे नाव आहे. यमकनमर्डीचे पोलिस निरीक्षक जावेद मुशापुरी यांनी केलेल्या तपासामुळे या प्रकरणाचा आता उलगडा झाला आहे.
अपघाती मृत्यू भासवून त्यावेळी संदीप यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. परंतु, हा संशयास्पद मृत्यू असल्याने गुरुवारी घोडगेरी येथे दफन केलेला मृतदेह पोलिसांच्या समक्ष उकरून काढला. याची डीएनए चाचणी तसेच अन्य तपासणी करण्यासाठी काही अवयव बंगळूरला पाठवण्यात आले आहेत. घोडगेरी येथील संदीप यांचा १३ मार्च रोजी घटप्रभाजवळ किरकोळ अपघात झाला होता. या अपघातात ते किरकोळ जखमी होऊन घटप्रभा येथील एका हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. त्यांच्या पत्नीचे एकाशी अनैतिक संबंध असल्याने व पतीच्या नावे मोठा विमा असल्याने त्याची रक्कम हडप करण्यासाठी प्रियकरासोबत तिने पतीच्या हत्येचे नियोजन केले.
पती ज्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते त्या ठिकाणी जाऊन तिने त्यांना लावलेल्या सलाईनमध्ये चक्क कीटकनाशक मिसळले. जास्त गंभीर जखमी नसलेल्या संदीप यांना डॉक्टर लवकरच घरी जाऊ देणार होते. तत्पूर्वीच त्यांचा अचानक मृत्यू झाला. पत्नीने हा अपघाती मृत्यू असल्याचा बनाव केला. अपघात असल्याने पोलिसांनीही शवचिकित्सा करून मृतदेह पत्नीसह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. त्यावेळी संदीप यांच्यावर गावातील स्मशानभूमीत दफनविधी करण्यात आले.
अपघाताच्या दिशेने शवचिकित्सा
जेव्हा याचा अहवाल न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठवला तेव्हा तेथेदेखील याची तपासणी अपघाताच्या दिशेने झाली. त्यामुळे या शवचिकित्सा अहवालात विषारी औषधासंबंधीचा काहीही उल्लेख आला नाही. त्यामुळे त्याची गणना अपघात अशीच झाली. आता संबंधिताचा मृतदेह पोलिसांनी उकरून काढला असून, त्याचे काही नमुने प्रयोग शाळेकडे पाठवण्यात आले आहेत. त्याची डीएनए चाचणी तसेच अन्य तपासण्या करून विषारी औषधाचे काही नमुने मिळतात का, याची चाचपणी केली जाणार आहे.
कबुलीमुळे प्रकार उघड
हा प्रकार घटप्रभा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला असला, तरी काही अज्ञात सूत्रांकडून हा खून असल्याची माहिती यमकनमर्डीचे पोलिस निरीक्षक जावेद मुशापुरी यांच्यापर्यंत गेली होती. त्यांनी या दिशेने तपास सुरू केला. मृताची पत्नी व प्रियकर यांना बोलावून त्यांची उलटतपासणी घेताच त्यांनी आपण सलाईनमध्ये विषारी औषध मिसळल्याची कबुली दिल्याचे सूत्रांकडून समजते. परंतु, मृताच्या शरीरात विषारी औषध गेले होते, याचे अद्याप तरी कोणतेही ठोस पुरावे मिळालेले नाहीत. त्यामुळे पोलिसांसमोर तपासात अद्यापही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. सर्व तपास करूनच संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येईल. त्यामुळे अद्याप कोणालाही अटक केली नसल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.