

बेळगाव : अशोकनगरातील ईएसआय रुग्णालयाची इमारत धोकादायक यादीत येऊन तीन वर्षाचा कालावधी लोटला आहे. आता आमदार राजू सेट यांनी या विषयात लक्ष घातल्याने रुग्णालय स्थलांतराच्या कामाला गती मिळाली आहे. अशोकनगरातील इमारत जमीनदोस्त करणार असल्याने येथील कारभार शनिवारपूर्वी (दि. 14) यमनापूरमधील ईएसआयच्या विभागीय कार्यालयाच्या तळमजल्यात हलवण्यात येणार आहे.
यमनापूरमधील इमारतीत तपासणीसाठी आवश्यक सुविधा या ठिकाणी उभारण्यात येत आहेत. शनिवारपयर्र्त सर्व कारभार यमनापुरात हलवण्यात येणार आहे. इमारत बांधण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या असून केंद्र सरकारकडून हिरवा कंदिल मिळाल्यानंतर प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होणार आहे, अशी माहिती अशोकनगर रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. मंजुनाथ कळसण्णावर यांनी दिली.
अशोकनगरातील ईएसआय रुग्णालयात सध्या दोनच तज्ज्ञ डॉक्टर आहेत. या ठिकाणी मिळणारी औषधे स्थानिक पातळीवर असलेल्या ईएसआय दवाखान्यात मिळण्याची सोय करण्यात आली आहे. अशोकनगरातील 58 कर्मचार्यांच्या अन्य ठिकाणी बदली करण्यात आल्या आहेत.
खासगीत उपचार घ्यावयाचे असल्यास रुग्णाना स्वत:चे दोन फोटो, ईएसआय कार्ड, आधारकार्ड, कंपनीत सेवा बजावत असल्याचे पत्र याचे झेरॉक्स अर्जासोबत जोडावे लागत आहे. त्यासाठी ईएसआयकार्डला आधारकार्डची लिंक देणे बंधनकारक आहे. ही कागदपत्रे जमवण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांचा वेळ खर्ची पडत आहे. त्यामुळे, रुग्णालयाचे लवकरात लवकर स्थलांतर करण्याची मागणी आहे.
पाच वर्षांपूर्वी इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी तिरुचिरल्ली यांनी केले होते. या अहवालात असा निष्कर्ष काढण्यात आला होता की ईएसआयएस रुग्णालयाची इमारत आणि कर्मचारी निवासस्थान मानवी निवासासाठी अयोग्य आहे. इमारतीचे मजबुतीकरण करणे किफायतशीर ठरणार नसल्याचेही संस्थेने स्पष्ट केले होते. तरीही लाखो रुपये खचर्र्ून इमारतीवर पत्रे घालण्यात आले होते. आता ही इमारत बांधण्यासाठी 150 कोटीचा निधी देखील मंजूर झाला आहे. मात्र, जागेअभावी ब्रेक लागला होता. आता इमारत बांधण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या असून केंद्र सरकारकडून हिरवा कंदिल मिळाल्यानंतर बांधकामाला सुरुवात होणार आहे.