कसनाळात गॅस्ट्रो; एकाचा मृत्यू

गावातील एकूण रुग्णांची संख्या 65 वर पोहोचली
Epidemic outbreak of gastro in Kasnal
कसनाळात गॅस्ट्रो; एकाचा मृत्यूPudhari File Photo
Published on: 
Updated on: 

कारदगा : कसनाळ येथे गॅस्ट्रोच्या साथीने थैमान घातले असून पांडुरंग बचाराम पाटील (वय 52) या गावकर्‍याचा गॅस्ट्रोने मृत्यू झाला आहे. शिवाय बुधवारी आणखी 25 जणांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे गावातील एकूण रुग्णांची संख्या 65 वर पोहोचली आहे. रुग्णांना गावातील आरोग्य केंद्र तसेच कोल्हापूर आणि इचलकरंजीतील खासगी रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे.

बुधवारी प्रांताधिकारी संपगावे व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुकुमार भागाई यांनी गावाची पाहणी केली. गावात आता सरकारी रुग्णवाहिकेची 24 तास सोय करण्यात आली आहे. कसनाळमध्ये चार-पाच दिवसांपासून गावकर्‍यांना कूपनलिकेचे दूषित पाणी पिल्याने उलटी-जुलाबाचा त्रास होत आहे. सुरुवातीला दोघा-तिघांना गॅस्ट्रोची लागण झाली होती. पण, हा आकडा वाढून मंगळवारी 40 वर पोहोचला. गॅस्ट्रोची लागण झालेले पांडुरंग पाटील यांना दोन दिवस त्रास जाणवू लागल्याने त्यांना खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने मंगळवारी रात्री त्यांचे निधन झाले.

गळती ठरली गॅस्ट्रोला कारणीभूत

गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी माळभागातून गावात पाईपलाईनने पाणी आणले आहे. या पाईपलाईनमधून एका रहिवाशाने बेकायदेशीर नळ कनेक्शन घेतले आहे. या पाईपजवळून गटारींचे सांडपाणी जाते. हे सांडपाणी पिण्याच्या पाण्यात मिसळल्याने त्याच भागात ही समस्या उद्भवली आहे. 50 ते 60 जणांना जुलाब, उलटीचा त्रास जाणवू लागला आहे. एका गळतीने गावात गॅस्ट्रोची साथ झपाट्याने पसरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news