

कडोली : विदेशातील लाखो रुपयांची नोकरी सोडून केवळ आवडीखातर अत्याधुनिक पद्धतीने अपारंपरिक शेती करून लाखोंचे उत्पादन घेण्याची किमया केदनूरमधील एका अभियंत्याने केली आहे. आपल्या शेतात ‘ड्रॅगन फ्रूट’ची शेती करून त्यांनी शेतकऱ्यांना वेगळी वाट दाखविली आहे. मारुती तम्मण्णावर (मूळ रा. केदनूर, सध्या रा. बेळगाव) असे त्यांचे नाव आहे.
देवगिरी गावाजवळील केदनूर-मुक्तीमठ रोडलगत असलेल्या खडकाळ भागात त्यांनी 2023 मध्ये दोन एकर क्षेत्रात ड्रॅगन फ्रूट फुलविले आहे. ‘रेड जम्बो पोल मेथड’ पद्धतीने लागवड केलेली आहेत. एकूण 800 पोल उभारुन ड्रॅगन फ्रूटची 3,200 रोपे लावण्यात आलेली आहेत. त्यासाठी पहिली दोन वर्षे टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. सध्या विहिरीचे पाणी ठिबक सिंचनद्वारे देण्यात येत आहे. वर्षातून एकदा जून ते सप्टेंबर महिन्यात फळे काढली जातात. आतापर्यंत दोनवेळा काढणी झाली आहे. पहिल्यावर्षी तीन टन उत्पादन व तीन लाख रुपये उत्पन्न मिळाले. दुसऱ्यावर्षी सहा टन उत्पादन व सहा लाख रुपये उत्पन्न मिळाले. या शेतीसाठी त्यांनी आतापर्यंत 9 लाख रुपये खर्च केलेले आहेत.
बेळगावसह गोवा व महाराष्ट्रात ड्रॅगन फ्रूट विक्रीसाठी पाठविण्यात येते. फलोत्पादन व कृषी खात्याच्या मार्गदर्शनानुसार सेंद्रिय पद्धतीने शेती करताना पाण्याचे नियोजन केले जाते. आंतरपिकातून काटेरी वांगी, कलिंगडाचे उत्पादन घेत आहे. तसेच चारी बाजूंनी चोहोबाजूने ॲपट, अंजीर, रम्बुतान, अव्हाकॅडो, सुपारी आदी रोपे लावलेली आहेत. दुसऱ्या दीड एकरात 1,300 पपईची झाडे लावली आहेत. त्यात कोबी आंतरपीक घेतले आहे, असे तम्मण्णावर यांनी सांगितले.
नोकरी सोडून शेतीत
मारुती तम्मण्णावर यांचे प्राथमिक शिक्षण केदनूरमधील सरकारी मराठी शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण कडोलीतील शिवाजी हायस्कूलमध्ये झाले. सरकारी पॉलिटेक्निकमधून इलेक्ट्रिक इंजिनियरची पदवी घेतल्यानंतर ते प्रथम मुंबईत नोकरीला लागले. तेथून पुढे दक्षिण अफ्रिकेला गेले. नंतर दुबईत नोकरी करताना शेतीची आवड निर्माण झाल्याने लाखो रुपयांची नोकरी सोडून ते शेती व्यवसायाकडे वळले.