

बेळगाव : सरकारी प्राथमिक शाळेत पदवीधर शिक्षक अनेक वषार्ंपासून अध्यापन करत आहेत. त्यांना बढती मिळालेली नाही. शिक्षण खाते आता पदवीधर शिक्षकांना हायस्कूलमध्ये बढती देणार आहे. लवकरच प्रक्रिया राबविणार आहे. त्यासाठी शिक्षकांची माहिती गेल्या वर्षीच संकलित करण्यात आली आहे.
प्राथमिक शाळेत पहिली ते पाचवी वर्गासाठी प्राथमिक शाळा शिक्षक (पीएसटी) आणि उच्च प्राथमिक अर्थात सहावी ते आठवी वर्गासाठी पदवीधर शाळा शिक्षक (जीपीटी) जागा भरून घेतल्या गेल्या आहेत. मात्र अनेक वषांर्ंपासून पदवीधर शिक्षकांना बढती मिळालेली नाही. त्यामुळे शिक्षक संघटनेने शिक्षण मंत्री, मुख्यमंत्र्यांना भेटून पदवीधर शिक्षकांना पुढील वगार्मसाठी बढती मिळावी, अशी मागणी केली होती. त्याची दखल घेऊन गतवर्षी शिक्षण खात्याने सर्व जिल्ह्यातील गट शिक्षणाधिकारी कार्यालयातून सरकारी शाळेतील शिक्षकांच्या पदव्या आणि संबंधित विद्यापीठांची माहिती जमवण्यात आली होती. बीए, एमए, आणि बीएड पदव्यांसंदर्भातील कागदपत्रे एकत्रित केली आहेत. सदर शिक्षकांना माध्यमिक शाळेत बढती दिली जाणार आहे.
राज्यातील शिक्षणाच्या गुणवत्तेत घसरण होण्याचे प्रमुख कारण म्हणजे शिक्षकांची कमतरता. कर्नाटकातील 41,905 सरकारी प्राथमिक शाळांसाठी 1,88,531 शिक्षकांची गरज आहेत. मात्र फक्त 1,38,802 शिक्षक कार्यरत आहेत. 49,729 पदे रिक्त आहेत. तसेच 4,871 सरकारी हायस्कूलसाठी 44,406 शिक्षक मंजूर आहेत. त्यापैकी 32,610 शिक्षक कार्यरत आहेत. तर 11,796 पदे रिक्त आहेत. त्यामुळे या रिक्त जागाही भरण्याची गरज आहे.
माध्यमिक शाळांमधीलही पदव्युत्तर पदवी घेतलेल्या शिक्षकांची माहिती संग्रहित करण्यात आली आहे. सदर शिक्षकांना पदवीपूर्व महाविद्यालयांत बढती दिली जाणार आहे. त्या संदर्भात चाचपणी सुरू आहे. प्रक्रिया राबविण्यासाठी शिक्षण खात्याने हालचाली सुरू केल्या आहेत.