

बेळगाव : बेळगावचे अतिरिक्त अबकारी आयुक्त डॉ. वाय. मंजुनाथ यांचे घर, कार्यालय तसेच मित्रांची निवासस्थाने लक्ष्य करत ईडीने बुधवारी बेळगाव, अथणी, बंगळूर, सोलापूर, गोव्यासह तब्बल २० ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले. बेहिशेबी मालमत्ता, परदेशात मोठी रक्कम वर्ग केल्याच्या संशयातून ही कारवाई सुरू झाली आहे. मंजुनाथ हे राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री सतीश जारकिहोळी यांचे मेहुणे, तर बळ्ळारीचे माजी खासदार देवंद्रप्पा यांचे पुत्र आहेत.
बुधवारी सकाळी सातच्या सुमारास डॉ. मंजुनाथ यांच्याशी संबंधित बेळगाव, गोवा, बंगळूर, म्हैसूरसह सहा ठिकाणी ईडी पथकाने छापे टाकले. छाप्यांत काही महत्त्वाची कागदपत्रे, मालमत्तेसंबंधीचे दस्तावेज, बार अँड रेस्टॉरंटसंबंधी अनेक कागदपत्रे सापडल्याचे सांगण्यात येते. गोवा व बंगळूर येथील ईडीचे अधिकारी या छाप्यात सहभागी झाले होते. मंत्री जारकिहोळी यांच्या बहिणीचे पती असलेले डॉ. मंजुनाथ हे गेल्या अनेक वर्षांपासून बेळगावात कार्यरत आहेत. राजकीय वशिला व स्वतःच्या पदाचा गैरवापर करत त्यांनी मोठी माया जमलवल्याचा संशय ईडीला असल्याने हा छापा टाकल्याचे सांगण्यात येते.
बेळगावातील त्यांचे हनुमाननगर येथील घर, कार्यालय, अथणी तालुक्यातील ऐनापूर येथील त्यांच्या मित्राचे घर, बंगळूर येथील ते राहत असलेले अपार्टमेंट, हासन जिल्ह्यातील अरसीकेरे येथील नातेवाईकाचे घर येथेही छापे टाकण्यात आले. सध्या डॉ. मंजुनाथ हे बंगळूरमधील 'समिट अपार्टमेंट'मध्ये राहत आहेत. तेथेही छापे टाकण्यात आले.