

बंगळूर : राज्यात एकेकाळी मोठी खळबळ माजवलेल्या बिटकॉईन घोटाळ्यात आता ईडीने पुन्हा कारवाई तीव्र करताना सोमवारी काँग्रेस आमदार, त्यांचे पुत्र तसेच माजी केंद्रिय मंत्र्याच्या नातवाच्या निवासासह एकाच वेळी 17 ठिकाणी छापे टाकले. बिटकॉईनमध्ये काळा पैसा गुंतवला गेल्याचा संशय ईडीला (सक्तवसुली संचलनालय) आहे.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी बंगळूर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष व काँग्रेसचे आमदार एन. ए. हॅरिस यांचे घर, माजी केंद्रीय मंत्री रहमान खान यांच्या नातवाचे निवासस्थान व कार्यालयासह 17 ठिकाणी एकाच वेळी सोमवारी छापे टाकून कागदपत्रांची तपासणी केली. श्रीकीसोबत आर्थिक संबंध असल्याचे आढळून आल्यानंतर ईडीने त्यांच्यावर छापे टाकले.
आमदार हॅरीस यांचे सुपुत्र नलपाड याचे श्रीकीसोबत सहा वर्षे आर्थिक संबंध होते. त्या दोघांनी मिळून 4.5 कोटी रुपयांचा व्यवहार केला होता. त्यामुळे ईडीच्या सहा अधिकाऱ्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रेहान खान व नलपाड यांच्या निवासस्थानाची छापा टाकून पाहणी केली आहे. हॅकर श्रीकी हा रहमान खानच्या नातवाच्याही संपर्कात होता. 2021 मध्ये सीसीबीकडून माहिती मिळाल्यानंतर ईडी तपास करत असून सोमवारी या तपासाच्या संदर्भात एक छापा टाकण्यात आला आहे. माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई राज्याचे गृहमंत्री असताना उघडकीस आलेल्या या प्रकरणात तत्कालीन सरकारमधील अनेक प्रभावशाली व्यक्तींंचा सहभाग असल्याचा आरोप झाला होता.