Satish Jarkiholi ED Raid: तीन कोटी रोकड जप्त; परदेशात १५ लाख

कोलकात्यासह २१ ठिकाणी छापे : मंत्री जारकिहोळींसह कुटुंबावरील छाप्यातील तपशील उघड
Satish Jarkiholi ED raid
Satish Jarkiholipudhari photo
Published on
Updated on

बेळगाव : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मंत्री सतीश जारकिहोळी यांच्याशी संबंधीत २१ ठिकाणी छापे घातले आहेत. त्यात बंगळूर, बेळगाव, गोकाकसह कोलकात्याचाही समावेश आहे. या छाप्यात आतापर्यंत ३ कोटी ३ लाखांची रोख रक्कम व परदेशात १५ लाख रुपये गुंतवणूक केल्याचे समोर आले आहे.

परदेशात कांगो, झांबिया व आफ्रिकेत गुंतवणूक असल्याची कागदपत्रे सापडली आहे. विशेष म्हणजे परदेशातील गुंतवणुकीची रक्कम कर्नाटकातील पीडब्ल्यूडीचे टेंडर घेण्यासाठी लाचेच्या स्वरुपात कोलकाता येथील कंपनीने गुंतवल्याचे कागदपत्रांवरुन प्राथमिक तपासात स्पष्ट होत आहे.

राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री सतीश जारकिहोळी, त्यांच्या कुटुंबातील सदस्य व त्यांच्या निकटवर्तीयांवर ९ व १० रोजी सप्टेंबर अशी दोन दिवस कारवाई केली. याबाबतचे पत्रक ईडीने त्यांच्या एक्सवर अपलोड केले आहे. त्यात असे म्हटले आहे की, परदेशात गुंतवणूक केल्याचा संशय असल्याने परकीय चलन व्यवस्थापन कायद्यातील (फेमा) तरतुदीनुसार ही कारवाई झाली आहे.

कारवाईत चिकोडीच्या खासदार आणि सतीश जारकिहोळी यांची कन्या प्रियांका जारकीहोळी, त्यांचे पुत्र राहुल जारकीहोळी, मेहुणे डॉ. वाय. डी. मंजुनाथ यांच्यावर छापे टाकले. याशिवाय जारकिहोळी यांचे स्वीय साहाय्यक मलगौडा पाटील, त्यांचे आर्थिक व्यवहार सांभाळणारे गोकाक येथील राजू दरगशेट्टी, विठ्ठल पसरण्णावर व व्यवसायिक संबंध असलेले डॉ. गिरीश सोनवालकर यांच्यावरही छापे टाकण्यात आले.

कोलकाता येथे कार्यरत असलेली एसएस भारत वाणिज्य पूर्व प्रा. लि., (बीव्हीईपीएल) या कंपनीने कर्नाटकातील सार्वजनिक बांधकाम खात्याची निविदा भरुन ते काम मिळविण्यासाठी मोठी लाच दिल्याचा संशय आहे. ही लाचेची रक्कम थेट न घेता परदेशी मालमत्ता खरेदीसाठी व परदेशात गुंतवणूक करण्यासाठी वापरल्याचा संशय ईडीला होता. त्यामुळे ईडीने बीव्हीईपीएलच्या मालकाच्या कार्यालयाची, बंगल्याची व अन्य दोन ठिकाणे अशी चार ठिकाणी छापेमारी करून कागदपत्रे हस्तगत केली आहेत.

परदेशात गुंतवणुकीची कागदपत्रे

ही गुंतवणूक थेट जारकिहोळी कुटुंबाने केलेली नसली तरी बीव्हीईपीएल कंपनीने केली आहे. मुलगी खासदार प्रियांका, मुलगा राहुल, त्यांची बहीण व डॉ. वाय. मंजुनाथ यांची पत्नी महादेवी मंजुनाथ यांना विविध देशांमधील संस्थांमध्ये काही भागभांडवल खरेदी केल्याचे कोलकाता येथील तपासात स्पष्ट झाले आहे. याचा सखोल तपास केला असता मे. एल्डोरोडो मायनिंग रिसोर्सेस (कांगो), मे. नावा औरम मायनिंग लि.,(झांबिया) येथे ही गुंतवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. सतीश जारकिहोळी यांची कांगोतील मे. मॅग्निट्युड स्टार सार्ल या सुवर्ण खाण कंपनीत ४० टक्के भागीदारी असल्याची कागदपत्रेही ईडीच्या हाती लागलेली आहेत. तसेच आफ्रिकेतील खाण व्यवसायात असलेल्या विविध संस्थांमध्येही भागीदारी असल्याची कागदपत्रेही सापडली असून ईडीने ती जप्त केली आहेत.

तीन कोटींची रोकड जप्त

एकाचवेळी २१ ठिकाणी झालेल्या छापेमारीत बंगळूरमधील डॉलर्स कॉलनीतील निवासस्थान, क्रेसेंट रोडवरील त्यांचे कार्यालय, गोकाक व बेळगावमधील छाप्यात काय मिळाले, याचा तपशीलही ईडीने दिला आहे. फेमांतर्गत मिळालेल्या कारवाईत अमेरिकन डॉलर व युरोमध्ये असलेले भारतीय मूल्यातील १५ लाख रुपये मिळाले आहेत. शिवाय ३ कोटी ३ लाखांची रोकड मिळाली असून ती देखील जप्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news