बंगळूर : पुढारी वृत्तसेवा
म्हैसूर नगरविकास प्राधिकरणामध्ये (मुडा) झालेल्या भूखंड घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (इडी) एफआयआर दाखल केला आहे. आता प्रत्यक्ष तपासाला सुरुवात केली असून मुडा कार्यालय आणि संशयित देवराजू यांच्या निवासावर छापे घालण्यात आले. भूखंड घोटाळ्याशी संबंधित कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. यावेळी पोलिस अधिकारी आणि सीआरपीएफ जवान तैनात करण्यात आले होते. मुडा मुख्य कार्यालयासह शहर आणि तालुका कार्यालयावरही छापे घालण्यात आले. एकूण 12 अधिकार्यांच्या पथकाने छापे घालून फायली तपासल्या. सामाजिक कार्यकर्ते स्नेहमयी कृष्णा यांनी मुडाकडून भूखंड घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. या प्रकरणात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचाही हात असल्याचे त्यांनी सांगितले होते. याबाबत लोकप्रतिनिधी विशेष न्यायालयाने लोकायुक्त चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर ईडीने स्वत:हून तपास सुरू केला. स्नेहमयी कृष्णा यांच्या तक्रारीनुसार इडीने एफआयआर दाखल केला होता.
मुडाने 50:50 या प्रमाणात अनेकांना भूखंडांचे वितरण केले होते. सदर भूखंड मिळवणार्यांचे नाव, घरचा पत्ता तसेच विविध माहिती ईडी अधिकार्यांनी घेतली. याआधी तीनवेळा ईडी अधिकार्यांनी मुडा अधिकार्यांना घोटाळ्याशी संबंधित कागदपत्रे सादर करण्याची सूचना दिली होती. याबाबत नोटीसही पाठवली होती. पण, अधिकार्यांनी त्यास प्रतिसाद दिला नव्हता. त्यामुळे ईडीने छापा घालून तपास केला. म्हैसूरमधील मुडा कार्यालयासह बंगळुरातील देवराजू यांच्या निवासावरही छापा घालून तपास करण्यात आला. मुख्यमंत्री सिद्धरामय्यांविरुद्ध करण्यात आलेल्या भूखंडाच्या घोटाळ्यामध्ये देवराजू हे जमीन मालक आहेत. म्हैसूरमधील तहसील कार्यालयावरही छापा घालण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. मुडा सचिवांनी तपासाला संपूर्ण सहकार्य करणार असल्याचे ईडी अधिकार्यांना सांगितले आहे. शनिवारीही तपास सुरुच राहणार आहे. मुडा कार्यालयातील दैनंदिन कामकाजाची माहिती देण्याची सूचना ईडीने केली आहे. भूखंडांची मूळ कागदपत्रे सादर करावीत. नक्कल प्रत सादर करु नये, अशी सूचना दिली आहे. तपासाविषयी कुणालाही कळवू नये, असे बजावल्याची माहिती मुडा सचिवांनी दिली.
मुडा घोटाळ्यामध्ये मुख्यमंत्री सिद्धरामय्या मुख्य संशयित आहेत. मुडानंतर आता त्यांच्या निवासावर कोणत्याही वेळी ईडीकडून छापा घालण्यात येण्याची शक्यता आहे. त्यांना चौकशीला हजर राहण्याची सूचनाही ईडी अधिकारी देतील, असा अंदाज आहे.