DK Shivakumar | दक्षिण भारतामुळेच ‘भारत’ सशक्त : डी. के. शिवकुमार

कर्नाटकासह दक्षिणी राज्यांना निधी वाटपात न्यायाची मागणी
DK Shivakumar
DK Shivakumar
Published on
Updated on

बंगळूर : कर्नाटक राज्य सशक्त होते, तेव्हा दक्षिण भारत सशक्त होतो आणि दक्षिण भारत सशक्त होतो, तेव्हा खऱ्या अर्थाने भारत अधिक सशक्त होतो. भारताच्या विकासातील भागीदार असलेल्या कर्नाटकासह दक्षिण भारतीय राज्यांना निधी वाटपात न्याय द्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना केले. तमिळनाडूतील महाबलीपुरम येथे गुरूवारी आयोजित ३१ व्या दक्षिण विभागीय परिषदेत ते बोलत होते. दक्षिण भारतीय राज्यांचे मुख्यमंत्री परिषदेत सहभागी झाले होते.

शिवकुमार म्हणाले, दक्षिण भारताला राजकीय व आर्थिकदृष्ट्या त्याचा योग्य वाटा मिळणे गरजेचे आहे. अर्थात् इथे आम्ही तक्रार करण्यासाठी आलेलो नाही. मात्र अर्थव्यवस्थेचे नेतृत्व करणाऱ्या राज्यांना योग्य आदर व न्याय देण्यासाठी आलो आहोत. आम्ही भारताचे भविष्य उज्ज्वल करणाऱ्या संधी निर्माण करत राहू.

मी केवळ कर्नाटकच्यावतीनेच नव्हे तर संपूर्ण दक्षिण भारताच्यावतीने बोलत आहे. भारताच्या विकासाचा मार्ग दक्षिण भारतातूनच जातो. भारताच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे २० टक्‍के लोकसंख्या असून आपली पाच राज्ये देशाच्या एकूण जीडीपीमध्ये सुमारे ३३ टक्‍के योगदान देतात. भारतीय अर्थव्यवस्थेत निर्माण होणाऱ्या प्रत्येक तीन रुपयांपैकी एक रुपया दक्षिण भारतातून येतो, मात्र केंद्राकडून दिल्या जाणाऱ्या वाट्यात या राज्यांना न्याय मिळत नाही, अशी खंत शिवकुमारांनी व्यक्त केली.

कर्नाटक अव्वल निर्यातदार

कर्नाटक देशातील पहिल्या क्रमांकाचे सॉफ्टवेअर निर्यातदार राज्य आहे. भारताच्या सॉफ्टवेअर निर्यातीत कर्नाटकचा ४२ टक्‍के वाटा आहे. भारताच्या लोकसंख्येत कर्नाटकचा वाटा केवळ ५.५ टक्‍के असला तरी देशाच्या जीडीपीमध्ये आमचे योगदान ९ टक्‍के आहे. देशातील ६० टक्‍के एरोस्पेस उद्योग कर्नाटकात आहेत. भारताच्या कॉफी उत्पादनात सुमारे ७० टक्‍के वाटा व प्रक्रिया केलेल्या काकडीच्या निर्यातीत ९० टक्‍के आहे.

कॅलिफोर्नियाचे सिलिकॉन व्हॅली, न्यूयॉर्क, बीजिंग व लंडन यांच्यासोबत बंगळूरला आज जगातील पहिल्या पाच एआय शहरांपैकी एक म्हणून ओळखले जाते. १५ व्या वित्त आयोगाने कर्नाटकसाठी ५ हजार ४९५ कोटी रुपयांचे विशेष अनुदान व ६ हजार कोटी रुपयांचे राज्य-विशिष्ट अनुदान देण्याची शिफारस केली होती. मात्र ही अनुदाने अद्याप वितरित झाली नाहीत. १६ व्या वित्त आयोगाने कर्नाटकचा वाटा ३.६४ वरून ४.१३ टक्‍क्‍यांपर्यंत वाढवून राज्याला अंशतः न्याय दिला. तथापि, आपला वाटा पूर्णपणे मिळालेला नाही, असेही शिवकुमार म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news